Bacterial Infection Treatment : सध्या कोरोनासोबतच जिवाणूजन्य आजार ( Bacterial Infection ) वाढताना दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळे लोकांना फ्लू, सर्दी किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असे आजार होत आहेत. कोरोना महामारीमुळे लोकांनी बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून बचाव होण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. त्यामधील एक चांगली सवय म्हणजे हात धुणे. पण सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळतोय, त्यामुळे लोक पुन्हा या सवयींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.


गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. बदलत्या मोसमात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशावेळी आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. छोटी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. योग्य काळजी घेतल्यास तुमचं बॅक्टेरियल इन्फेक्शन यांपासून बचाव होईल. नाहीतर तुम्हाला जिवाणूजन्य आजारांची लागण होईल. बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी काय कराल?


'या' कारणांमुळे होऊ शकतो टायफॉइड


टायफॉइड हा एक जिवाणूजन्य आजार आहे. दूषित अन्न आणि दूषित पाणी प्यायल्यामुळे टायफॉइड पसरण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला टायफॉइडची लागण झाली असेल आणि ती शौचास गेली असेल. शौचाला जाऊन आल्यावर हात नीट स्वच्छ धुतले नाहीत आणि अन्न किंवा इतर वस्तूंना हात लावला, तर तिथे टायफॉईडचे जिवाणू पसरतात. जर एखाद्या निरोगी व्यक्तीने त्या व्यक्तीला किंवा त्याने स्पर्श केलेल्या इतर वस्तूंना स्पर्श केला तर ते जिवाणू निरोगी व्यक्तीपर्यंत आणि नंतर त्याच्या हाताद्वारे तोंडापर्यंत पोहोचतात. यामुळे निरोगी व्यक्तीच्या शरीरात जिवाणू पोहोचून त्यालाही टायफॉईडटी लागण होते. त्यामुळे हात नियमितपणे स्वच्छ धुतले पाहिजेत. 


अशी ओळखा लक्षणे 


जर तुम्ही आज टायफॉइड जिवाणूच्या संपर्कात आला असाल, तर याची लक्षणे लगेच दिसत नाहीत. टायफॉईडटी लक्षणे दिसायला किमान एक ते तीन आठवड्याचा कालावधी लागते. याची लक्षणे म्हणजे डोकेदुखी, अशक्तपणा, थकवा, जास्त घाम येणे, कोरडा खोकला, वजन झपाट्याने कमी होणे, पोटदुखी, अतिसार आणि शरीरावर पुरळ येणे ही आहेत.


टायफॉइड आजारावरील उपचार


टायफॉइड हा जिवाणूजन्य ( Bacteria ) आजार आहे, त्यामुळे त्यावर अँटीबायोटिक उपचार केले जातात. टायफॉइडचा संसर्ग रुग्णामध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. त्या आधारावर, 7 ते 15 दिवसांचा कोर्स देत रुग्णावर उपचार केले जातात. उपचारात दुर्लक्ष केल्यामुळे आतड्यांतील संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.