Health Tips : सूर्याची दाहकता दिवसागणिकअ अधिकच जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत वालानुकुलित खोलीत राहण्याची, आइस्क्रिम खायची, फळांचा रस प्यायची, पातळ आणि हलके कपडे घालण्याची आणि बाहेर न जाता घरातच थांबण्याची तीव्र गरज वाटू लागते. हा विचार करत असताना आपण डोळे या अतिशय महत्त्वाच्या अवयवाकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. 


त्वचेची काळजी घेण्यासाठीची पथ्ये कटाक्षाने पाळली जातात आणि उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्षही दिलं जातं. उन्हाळ्यात त्वचेप्रमाणंच डोळ्यांचे रक्षणही तितकेच महत्त्वाचे. 


कॉन्जंक्टिव्हायटिसमुळे डोळ्यांचा संसर्ग अंदाजे 30% वाढत असल्याचे निरीक्षण आहे. तापमानातील वाढीमुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे जास्त गरजेचे ठरते, असे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात. इतकंच नव्हे तर, पुढील काही समस्याही सर्रास आढळतात.


Covid-19 : लहान मुलांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल? अशी घ्या काळजी


- सुर्यप्रकाशामध्ये अतिनिल किरणांचा समावेश असल्याने मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो, रेटिनाचे नुकसान होण्याची म्हणजे सोलार रेटिनोपॅथीची संभाव्य शक्यताही वाढते. 


- सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांशी थेट संपर्क आला तर पेरिजिअम म्हणजे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ करणारा आजार होऊ शकतो. 


- उन्हाळ्यामध्ये अनेकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो. उन्हाळ्याच्या दरम्यान, सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो व त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते. 


- अॅलर्जिक कॉन्जंक्टिव्हायटिस व व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिस यामध्ये अचानक वाढ होत असल्याचेही आमच्या मेडिकल सेंटरमध्ये आढळले आहे.


उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी? 


- उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे, परिपूर्ण आहार घेणे आणि पाणीदार फळे खाणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होत असल्याने याद्वारे उन्हाळ्यामध्ये हायड्रेटेड राहावे. 


- डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात, तसेच त्यामुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो. 


- व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करा, जसे हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई, इ. 


- डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. उन्हाळ्यामध्ये त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते. 


डोळे या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची योग्य काळजी घेणयासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि वर नमूद केलेल्या टिप्स अमलात आणणे गरजेचे आहे.


माहिती सौजन्य- डॉ. वामशिधर, फॅको रेफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल