Health Tips : निरोगी आयुष्य जगावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, बदलती जीवनशैली (Lifestyle), कामाचा वाढता ताण, वेळीअवेळी जेवण या जीवनशैलीशी संबंधित काही वाईट सवयी आपल्या हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. आजकाल तारुण्यात सांधेदुखी किंवा किरकोळ दुखापतींमुळे फ्रॅक्चर होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. याची काळजी घेतली नाही तर वेदना खूप वाढतात.
जरी, लहानपणापासून हाडे मजबूत आणि निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. पण, आपण तारुण्यात देखील आपल्या हाडांचे आरोग्य मजबूत करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करू शकतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्हीही तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारू शकता.
आहारात कॅल्शियमचा समावेश करा
कॅल्शियम हाडे निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक पोषक आहे. तुमच्या आहारात याचा समावेश करण्यासाठी तुम्ही दुग्धजन्य पदार्थ, बदाम, ब्रोकोली, केळी आणि सोया उत्पादनांचे सेवन करू शकता. याशिवाय लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.
आहारात व्हिटॅमिन डीची काळजी घ्या
तुमच्या आहारात व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत म्हणून तुम्ही मासे आणि अंडी घेऊ शकता. शाकाहारी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या आहारात मशरूम, दूधचा समावेश करू शकता.
प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करा
जर तुम्हाला मजबूत हाडे हवी असतील तर पुरेशा प्रमाणात प्रथिने घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराला प्रत्येकाच्या वजनानुसार प्रोटीनची आवश्यकता असते. दूध, राजमा, दही, हरभरा, सोयाबीन, कोबी, वाटाणे, पालक, मशरूम यांसारख्या पदार्थांचे रोज सेवन करून तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.
शारीरिकरित्या सक्रिय राहा
तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा तुमच्या हाडांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. झोप न लागणे, व्यायामाचा अभाव, अन्नातील पोषक तत्वांचा अभाव अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे हाडे कमजोर होतात. दैनंदिन जीवनात शारीरिक हालचाली वाढवून तुम्ही तुमची झोपण्याची स्थिती बदलून हाडांच्या मजबूतीची काळजी घेऊ शकता.
मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमची हाडे पोकळ होतातच पण तुमच्या शरीरालाही नुकसान पोहोचते. धूम्रपानामुळे तुमच्या फुफ्फुसांचे नुकसान होते, तुमची हाडे कमकुवत होतात, त्यानंतर वेगाने चालताना तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यामुळे तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.