Health Tips : आपण बर्याचदा पाहतो की हवामान बदलताच मुले सर्वात जास्त आजारी पडू लागतात. विशेषत: जेव्हा पावसाळा आणि हिवाळ्याला (Winter) सुरुवात होते तेव्हा आजारांचा प्रादुर्भाव जास्त वेगाने पसरतो. जेव्हा हवामान बदलते तेव्हा मुलांना सामान्यतः विषाणूजन्य ताप, सर्दी-खोकला, संसर्ग आणि इतर संसर्गाचा त्रास होऊ लागतो. मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे असे घडते. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांची काळजी आणि त्यांच्या लाईफस्टाईलची (Lifestyle) विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मुले आजारी पडू नयेत. त्यासाठी मुलांचा योग्य आहार, झोप, व्यायाम, खेळ याकडेही लक्ष दिले पाहिजे.
हिवाळा असो वा उन्हाळा, व्यायाम प्रत्येक ऋतूत केला पाहिजे. हे केवळ प्रौढांसाठीच नाही तर मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की व्यायामामुळे शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आपला मूड सुधारतो. तसेच, सकाळच्या सूर्यप्रकाशात व्यायाम केल्याने शरीर बळकट होऊन रोगांशी लढण्यास मदत होते. त्यामुळे मुलांनीही नियमित व्यायाम केला पाहिजे.
पुरेशी झोप घ्या
लहान मुलांना पूर्ण झोप मिळणे खूप गरजेचे आहे. विशेषत: 12 वर्षाखालील मुलांनी किमान 9 तास झोपावे. झोप पूर्ण झाल्याने मुलं ताजेतवाने राहतात आणि ऊर्जा देखील मिळते. पूर्ण झोप मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत करते. आणि ते कमी आजारी पडतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या पूर्ण झोपेकडे लक्ष दिले पाहिजे.
संतुलित आहाराची काळजी घ्या.
मुलांना निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या आहारात सर्व पोषक तत्वांचा समतोल असायला हवा. मुलांना प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळायला हवे. फळे, भाज्या, दूध, कडधान्ये आणि अंडी यांसारख्या पौष्टिक आहारामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. संतुलित आहार घेतल्यास मुले कमी आजारी पडतात आणि लवकर बरी होतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा.
स्वच्छतेची काळजी घ्या.
मुलांना नेहमी हात धुण्याची सवय लावावी. अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवावेत. हिवाळा आला की मुलं आंघोळ घेण्यास कंटाळा करतात. अनेक वेळा पालकही याकडे लक्ष देत नाहीत. पण असे न करता मुलांना दररोज कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. अशा प्रकारे, स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास मुले कमी आजारी पडतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :