Drinking Water Habit:पावसाळा सुरु झाला की पाणी नेहमीपेक्षा आपण कमी पाणी प्यायला लागतो. हवेतील आर्दता वाढली की आपोआपच पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. मग वारंवार थकवा येणं, डिहायड्रेशमुळं डोकेदुखी आणि चक्कर येणं अशा कितीतरी समस्या जाणवू लागतात. शरीरातील पाणी कमी झाल्यानं आणि पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढलं की लघवी पिवळी होणं यासह काविळीसारखे आजारही वाढू लागतात. रोजच्या बिझी शेड्यूलमध्ये अनेकजण तर पाणी पिण्याची आठवण करून देणारे मोबाईल ॲप वापरताना दिसतात. पण आपण पुरेसं पाणी पितोय की नाही हे कसं ओळखायचं?


शरिराला वेगवेगळ्या प्रथिनं, व्हिटॅमिन्ससह पुरेसं पाणीही गरजेचं आहे. दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यासाठी थोड्या थोड्या वेळानं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. दिवसातील बराचसा वेळ आपण चहा कॉफीचं सेवन करत असतो. त्यामुळं पोटात द्रव्य पदार्थ तर जातात. पण त्याचा फक्त ॲसिडिटी आणि तात्पूरती ऊर्जा मिळवण्यासाठी होतो.  युएस राष्ट्रीय विज्ञान अभियात्रिकी आणि ओषध संस्थेनुसार, प्रौढ महिलांना दररोज ११ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. तर पुरुषांनी दररोज १५ ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. आपण पाणी कमी पित असू तर आपलं शरीर वेगवेगळ्या गोष्टीतून संकेत देत असतं. हे संकेत कोणते? या ७ चिन्हांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. 


तोंडाला कोरड पडणे


खूप वेळ पोटात कमी पाणी गेलं की आपलं तोंड कोरडं पडू लागल्याचं अनेकांना जाणवतं. पण याकडे आपण फार लवकर दूर्लक्ष करतो. पण हे लक्षण अतिशय महत्वाचं आहे. आपण पुरेसं पाणी पिण्याची गरज असल्याचं हे चिन्ह आहे. तोंड कोरडे पडल्यानंतर त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. शरिरातील पाणी कमी झाल्याचं हे प्राथमिक लक्षण असल्याचं तज्ञ सांगतात. खूप पायऱ्या चढल्यानं किंवा थोडं चालल्यानं तोंडाला कोरड पडते. जेंव्हा असं जाणवेल तेंव्हा लगेच पाणी प्यायला हवं.


लघवीचा रंग पिवळा होणे


जेंव्हा आपण कमी पाणी पितो तेंव्हा आपल्या लघवीचा रंग गडद होण्यासह लघवी पिवळी होण्याची समस्या अनेकांना जाणवते. डॉक्टरांच्या मते, लघवीचा फिकट रंग असणं हे शरिरात पाणी मुबलक असल्याचं लक्षण आहे. पण लघवीचा रंग पिवळा असेल तर शरिरातील पाणी वाढवण्याची गरज आहे. तुम्ही पुरेसं पाणी पिताय की नाही, हे समजण्याचं हेही एक चिन्ह आहे.


डोकेदुखी आणि चक्कर येणं


पाणी कमी पिल्यानं डोकं दुखणं यासह डिहायड्रेशनमुळं चक्कर येण्याची समस्या वाढते. कमी पाण्यामुळं आपल्या मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नाही. त्यामुळं चक्कर येत असल्याचे वाटू लागते. वारंवार चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 


वारंवार थकवा येणं


शरिरात योग्य प्रमाणात पाणी नसणं हे थकवा येण्याचं एक प्राथमिक लक्षण आहे. तुम्ही थोडी शारिरीक हलचाल केली तरी थकवा येऊ लागतो. याला कमी पाणी पिण्याची सवयच कारणीभूत असल्याचं तज्ञ सांगतात.  रक्ताचे प्रमाण कमी होण्याला कमी पाणी पिणं कारणीभूत असल्याचे डॉक्टर सांगतात. 


कोरडी त्वचा, ओठ कोरडे पडणे


तज्ञांच्या मते, पाणी कमी पिल्याने त्वचा कोरडी पडून ओठांवर रेषा दिसून येतात. काही जणांना ओठाची त्वचा निघण्याचेही लक्षण दिसू लागते. तुम्हालाही ओठ कोरडी पडल्याचे दिसत असेल किंवा त्वचा कोरडी पडून कोंडा झाल्याचे आढळून आल्यास पाणी पिणं गरजेचंय. यासाठी तुमच्या हाताच्या मागच्या बाजूच्या त्वचेला थोडे दाबून पाहिल्यास त्वचा जर सामान्य होण्यास वेळ लागत असल्याचे दिसल्यास पाण्याची कमतरता असल्याचे हे लक्षण समजावे असे तज्ञ सांगतात. 


डोळ्यांखाली काळी वर्तुळे


शरिरात पाणी पुरेसं असल्याचा त्वचेवर परिणाम होतो. तो पहिल्यांना डोळ्यांखाली दिसू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं पुरेसं पाणी पिल्यानं कमी होतो. तणाव, अधिक स्क्रीन टाईम हीसुद्ध डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं येण्यासाठी कारणीभूत असली तरी पाणी कमी पिल्यानेही ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.


बद्धकोष्ठता


आपण कमी पाणी पित असू तर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. जर तुम्ही खूप कमी प्यायले तर तुमच्या आतड्यांमधून स्टूलमधून खूप पाणी काढून टाकले जाते, ज्यामुळे त्यांचे प्रमाण कमी होते. जेव्हा आतड्यांसंबंधी मार्ग भरलेला नसतो, तेव्हा शरीराला कचरा काढून टाकण्याची सक्ती वाटत नाही.