Happiness Tips : आपण अनेकदा पाहतो जगात असे काही लोक असतात, जे इतके गंभीर असतात, की त्यांना हसणं (Smile) म्हणजे काय हे माहितच नसावं बहुतेक? याउलट असेही काही लोक असतात, ज्यांचं आयुष्य केवळ हास्यानं भरून गेलेलं असतं, कोणताही प्रसंग असो ते नेहमी हसत असतात, आणि इतरांनाही हसवतात. जगातील लोकसंख्या जितक्या वेगाने वाढत आहे, तितकाच कामाचा ताण, तणाव, नैराश्य आणि दुःखी असण्याची कारणंही वाढली आहेत. जिथे पाहावं तिथे शर्यत, सोबतीला नात्यातील ताणतणाव यामुळे लोक आनंदाच्या संधी शोधण्यात व्यस्त असतात. तसं पाहायला गेलं तर आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अडचणी येतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यामुळे सतत दुःखी राहायला पाहिजे. तुम्ही आनंदी राहिलात तर तुमच्या आयुष्यातील समस्या आपोआप सुटण्याचे मार्ग सापडतील. म्हणून, आनंदी राहण्यासाठी संधी शोधणे महत्वाचे आहे, यामुळे तुम्हाला केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही फायदा होईल. जीवनात आनंदी राहण्यासाठी काय केले पाहिजे? आनंदाची गुरुकिल्ली म्हणजेच आनंदी राहण्यासाठी टिप्स जाणून घेऊया.


 


आधी तुमच्या मनातून द्वेषाचे विचार काढून टाका


बऱ्याच वेळा तुम्ही लोकांवर इतके रागावता की, तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करून दुःखी होतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हाला आवडत नसलेल्या लोकांवर तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी, ज्या लोकांसोबत तुम्हाला चांगले वाटते, त्यांच्यासोबत वेळ घालवा. द्वेष केल्याने तुम्ही फक्त दुःखी व्हाल तर तुमच्या आवडीच्या लोकांसोबत तुम्हाला आनंद मिळेल.
सर्वात महत्वाचं म्हणजे, उद्याची काळजी करू नका भविष्याची चिंता करून, लोक दु: खी होतात. आजचा वेळ पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करा. येणारा काळ स्वतःहून चांगला जाईल. भवितव्याबद्दल आशावादी राहा आणि कठोर परिश्रम करा, तरीही काळजी करणे हा कशावरच उपाय नाही.


 


कोणाशीही तुलना करू नका


आजकाल लोक स्वतःची इतरांशी तुलना करून स्वतःला कमी दर्जाचे समजतात आणि त्यामुळे ते दुःखी होऊ लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते. काही लोकांची वेगळी खासियत असू शकते तर, काही इतर कामात तज्ज्ञ असू शकतात. म्हणून, आपल्या समवयस्कांशी तुलना करू नका. आपल्यातील चांगली व्यक्ती बाहेर आणा. यामुळे तुम्हाला आनंदी राहण्याची संधी मिळेल.


 


इतरांकडून अपेक्षा करू नका


आनंदी राहण्याचं महत्त्वाचं मूलमंत्र म्हणजे, कोणाकडूनही उगाच अपेक्षा करू नका, जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच दु:ख होईल. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवल्याने तुम्हाला दुःख होईल. म्हणून, कशाचीही अपेक्षा करू नका. प्रत्येक संभाव्य परिस्थितीशी लढण्यासाठी आपल्या कर्मावर तसेच सामर्थ्यावर विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर साहजिकच तुम्ही आनंदाचे पात्र व्हाल.


 


समस्यांचा उल्लेख करू नका


आपण अनेकदा पाहतो, काही लोक त्यांच्या समस्यांबद्दल सारखं रडत असतात. तुमच्या समस्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात आणि त्यावर उपाय शोधणे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्या समस्या इतरांसमोर मांडू नका. जे लोक खूप तक्रार करतात ते सहसा दुःखाचा डोंगर घेऊन जगतात. त्यामुळे समस्यांवर बोलण्यापेक्षा त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला अधिक आनंद वाटेल.


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Child Health : पेराल तसं उगवतंय हो! पालकांच्या 'या' सवयी मुलांना हुशार बनवतात, जीवनात मिळवतात यश, प्रत्येक पाऊल पुढे राहतात.