Hair Care Tips : केस गळणे, केस पातळ होणे (Hair Care Tips) आणि केस अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या आजकाल फार सामान्य झाल्या आहेत. बिघडलेली जीवनशैली (Lifestyle), वाढतं प्रदूषण आणि इतर कारणांमुळे केसांचं फार नुकसान होते. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे अनेक वेळा लोकांना लाज वाटते. कारण यामुळे तुमचा संपूर्ण लूक वाईट दिसतो. केस अकाली पांढरे होण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे तणाव. तसेच, पांढऱ्या केसांना लपविण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात.
जर तुम्हाला पांढरे केस काळे आणि दाट करायचे असतील तर तुम्ही यासाठी काही उपाय वापरून पाहू शकता. विशेष म्हणजे हे उपाय फार सोपे आहेत. याचे तुम्हाला चांगले परिणामही दिसतील.
कॉफी आणि मेहंदीचा उपाय
पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी लावणे ही फार जुनी पद्धत आहे. यामुळे केसांचे सौंदर्य वाढते आणि केस मजबूत होतात. मेहंदीमध्ये अनेक गोष्टी मिसळून दुप्पट फायदे मिळू शकतात. यापैकी एक म्हणजे मेहंदी पावडर पेस्टमध्ये कॉफी मिसळा. या दोन्ही गोष्टी रंग गडद करू शकतात.
'ही' पद्धत फॉलो करा
- सर्वात आधी भांड्यात पाणी गरम करा.
- यानंतर त्यामध्ये कॉफी पावडर टाका.
- दुसऱ्या भांड्यात मेहंदी पावडर, दही आणि कॉफीचे पाणी घाला.
- हे मिश्रण मिक्स करा आणि रात्रभर ठेवा.
- दुसऱ्या दिवशी, ही पेस्ट आंघोळीला जाण्याआधी केसांना लावा आणि सुमारे एक तासानंतर शॅम्पू करा.
केस स्वच्छ धुवा
केस पांढरे होण्याची समस्या दूर करण्यासाठी, ब्लॅक टीच्या हेअर रिंसने तुम्ही केस स्वच्छ धुवू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे ब्लॅक टी पाण्यात मिक्स करा. त्यात थोडे मीठ घालून पाणी उकळून घ्या. थंड झाल्यावर गाळून केसांना लावा. तुम्ही आठवड्यातून एकदा केस धुवून केसांना लावू शकता.
कढीपत्त्याचा 'असा' वापर करा
कढीपत्ता, अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. केवळ रोगांवर उपचार नाही तर केसांची चांगली काळजी घेण्यासाठी देखील कढीपत्ता वापरला जाऊ शकतो. केस काळे करण्यासाठी आवळा पावडरमध्ये कढीपत्त्याचा रस मिक्स करा आणि केसांना लावा. ही पेस्ट केसांवर तासभर राहू द्या. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :