Hair Care Tips : घनदाट आणि स्मूथ केसांसाठी (Hair Care Tips) आपण केसांची ट्रिटमेंट करतो. तसेच, केसांतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि टाळूवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्पा ट्रीटमेंट केली जाते. हिवाळ्यात तर स्पा ट्रिटमेंट करणं फार गरजेचं आहे कारण थंडीच्या दिवसांत केसांत कोंड्याची समस्या जास्त वाढते. त्यामुळे केसगळतीचा त्रास सुरु होतो. अशा वेळी पार्लरमध्ये जाऊन अवाढव्य पैसे खर्च करून हेअर स्पा करणं प्रत्येकाला परवडतंच असं नाही. याचसाठी आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशा सोप्या हेअर स्पाच्या टिप्स सांगणार आहोत.
15 ते 20 दिवस हेअर स्पा करत राहिल्यास हळूहळू कोंड्याची समस्या तर दूर होईलच, त्याचबरोबर केसगळतीही कमी होते. हेअर स्पामुळे केस निरोगी तर होतातच शिवाय चमकदारही होतात. हेअर स्पा ही अशी एक ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये क्रीम, कंडिशनर आणि स्टीम इत्यादींनी केसांचे डीप कंडिशनिंग केले जाते. यासाठी घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
हेअर स्पा साठी कोणत्या वस्तू लागतील?
जर तुम्हाला घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर तुम्हाला शॅम्पू, स्पा क्रीम किंवा कंडिशनर, स्वच्छ टॉवेल आणि गरम पाण्याची आवश्यकता असेल. हेअर स्पा क्रीम बाजारात 270 ते 300 रुपयांना मिळते. ही क्रीम दोन ते तीन वेळा सहज वापरता येते. तर कंडिशनरची बॉटलही 100 रुपयांच्या आत येते. अशा प्रकारे, कमी पैशांत आणि परवडणाऱ्या किंमतीत तुम्ही सहजपणे हेअर स्पा घरी करू शकता.
घरी हेअर स्पा कसा करायचा?
- सर्वात आधी, केस सौम्य शॅम्पूने धुवा, जेणेकरून टाळू आणि केसांवर साचलेली घाण साफ होईल.
- आता आपले केस पुसून टाका आणि ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या.
- आता केसांना स्पा क्रीम लावा.
- स्पा क्रीम लावल्यानंतर केस थोडे कोरडे होऊ द्या.
- आता केसांची वाफ काढण्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये पाणी चांगले गरम करा.
- टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि थोडासा पिळून केसांभोवती गुंडाळा.
- केसांना टॉवेल गुंडाळण्याची प्रक्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करा म्हणजे वाफ व्यवस्थित लावता येईल.
- टॉवेल खूप गरम किंवा खूप थंड नसावा याची काळजी घ्या.
- वाफवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, केस पाण्याने चांगले धुवा.
'हे' लक्षात ठेवा
जर तुम्ही केसांना स्पा क्रीम लावले असेल, तर वाफ घेतल्यावर कंडिशनर लावा आणि किमान दोन ते तीन मिनिटे केस धुवा. जर तुम्ही क्रीमऐवजी कंडिशनरने हेअर स्पा केला असेल, तर वाफ घेतल्यावर केस धुवा. आणि कोरडे करून विंचरा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.