Hair Care Tips : बदलत्या ऋतूमानानुसार शरीरात अनेक बदल होतात. काही दिवसांतच याचे पडसाद चेहऱ्यावर, केसांवर, त्वचेवर दिसू लागतात. केस गळणे (Hair Fall) हीदेखील त्यातलीच एक समस्या आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात केसगळतीचा त्रास अधिक जाणवतो. विशेषत: मुलींमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. केसांची निगा राखण्याची दिनचर्या बदलल्यामुळे, केस व्यवस्थित साफ न ​​केल्यामुळे किंवा कोंडा वाढल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात केसांकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. अशा परिस्थितीत काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवून केसांची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. केसगळती थांबविण्यासाठी कोणते उपाय करावेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.   


केसगळती थांबविण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स :


गरम पाण्याने केस धुणे टाळा : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणं तर अशक्यच आहे. त्यामुळे काही लोक गरम पाण्याने केस धुवतात. मात्र, असे न करता तुम्ही कोमट पाण्याने केस धुवा. तसेच, जास्त वेळ गरम शॉवरखाली उभे राहू नका. यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होते. 


केसांना तेल लावा : हिवाळ्यात केसांना हलक्या कोमट तेलाने मसाज करण्याची सवय लावा. यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा किंवा तुम्ही वापरत असेलल्या तेलाचा वापर करू शकता. तसेच केस धुवण्याच्या एक दिवस आधी किंवा 1-2 तास आधी तेल लावून छान मसाज करा. आणि नंतर केस धुवा. यामुळे केसांना गरम पाण्यापेक्षा कमी नुकसान होईल आणि केस धुतल्यानंतर केस पूर्वीपेक्षा निरोगी दिसतील. 


मास्क वापरा : निरोगी केसांसाठी आठवड्यातून एकदा केसांवर हेअर मास्क लावा. यामुळे केसांना प्रथिने आणि पोषक तत्व मिळतात. याशिवाय केसांची चिंता लक्षात घेऊन तुम्ही हेअर मास्क लावू शकता. अंडी, दही आणि मधाचा हेअर मास्क केसांसाठी चांगला आहे. कच्च्या दुधात मध मिसळून केसांना लावू शकता किंवा केस धुण्याच्या 15 मिनिटे आधी कोरफडीचे जेलदेखील तुम्ही लावू शकता. 


आवळ्याचा वापर करा : आवळ्याचा केसांसाठी देखील चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. हे केस गळतीला आतून प्रतिबंधित करते. हिवाळ्याच्या ऋतूत आवळा आरोग्यासाठीही उत्तम आहे. 


तूपाचे सेवन करा : हिवाळ्यात तुम्ही रोज तुपाचे सेवन करू शकता. याशिवाय केसांना तुपाने मसाज करा. ते लावण्यासाठी कापूस वापरा किंवा तुमच्या बोटांनी लावा. आयुर्वेदात केस गळणे थांबवण्यासाठी रात्री पायाला तूप लावणे देखील चांगले मानले जाते.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या


Health Tips : महिलांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज वयानुसार बदलते; कशी ते जाणून घ्या