Eye Care Tips : आपले डोळे (Eyes) हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहेत. डोळ्यांमुळेच (Eye Care Tips) आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतात. जर आपली दृष्टी कमजोर असेल तर अनेक गोष्टी साध्य करणं कठीण होऊन जातं.  यासाठीच आपल्या डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. पण, आपल्या अशा काही सवयी आहेत ज्या आपल्या डोळ्यांसाठी फार हानिकारक आहेत. याची जर वेळीच दखल घेतली तर अनेक समस्या दूर होऊ शकतात. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनशैलीतील अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे आपल्या डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.


स्क्रिन टाईमचा अधिक वापर 


सध्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक यावर आपण इतके अवलंबून आहोत की याशिवाय काम करण्याचा आपण विचारच करू शकत नाही. पण, या गॅजेट्सच्या अधिक वापरामुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतो. कोरोनानंतर तर या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. यासाठीच काही वेळाच्या अंतराने कामातून ब्रेक घ्या आणि 20-20-20 नियमाचं पालन करा. याचाच अर्थ प्रत्येक 20 मिनिटांच्या अंतराने 20 फूटच्या अंतरावर 20 सेकंदासाठी पाहा. यामुळे डोळ्यांना भरपूर आराम मिळेल. 


अंधारात काम करणं 


अनेकदा आपण लाईट बंद करून अंधारात किंवा टेबल लॅम्पच्या मदतीने काम करतो. यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण पडतो. कामात लक्ष केंद्रित करण्याच्या नादात आपल्या डोळ्यांवर फार स्ट्रेन येतो. ज्यामुळे डोळ्यांना फार नुकसान पोहोचतं. यासाठी काम करताना उजेडात काम करण्याचा प्रयत्न करा. 


अपुरी झोप 


दिवसभरातला थकवा दूर करण्यासाठी पुरेशी झोप मिळणं फार गरजेचं आहे. पण, झोप पूर्ण न झाल्यामुळे आपल्या मांसपेशी पूर्णपणे रिलॅक्स होत नाहीत. याचा आपल्या डोळ्यांवरही परिणाम होतो. यासाठी दिवसातून किमान 6 ते 7 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे  कोरडेपणा, लालसरपणा, खाज सुटणे यांसारख्या समस्या दूर होतील. 


व्हिटॅमिन ए ची कमतरता 


आपण जो आहार घेतो त्याचा आपल्या शरीरावर फार परिणाम होतो. एखाद्या पोषक तत्त्वाची कमतरता देखील आपल्या शरीरासाठी फार नुकसानकारक ठरू शकते. डोळ्यांच्या दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए खूप गरजेचं आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. यासाठी व्हिटॅमिन ए समृद्ध आहाराचा समावेश करा. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : निरोगी राहण्यासाठी मॅग्नेशियम का महत्त्वाचं? मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरावर होतात 'हे' परिणाम