Dev Diwali 2020 : आज 29 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला 'त्रिपुरारी पौर्णिमा' किंवा 'त्रिपुरी पौर्णिमा' असं म्हणतात. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 'देव दिवाळी' म्हणूनही संबोधलं जातं. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. अशी अख्यायिका आहे की, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला सगळे देव दिवाळी साजरी करतात आणि याच दिवशी देवांनी काशीत प्रवेश केला होता.


धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे. हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो. जगातील सर्वात जुने शहर काशीची ही संस्कृती आणि परंपरा आहे. हा सण काशीच्या ऐतिहासिक गंगेच्या घाटांवर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात. काशीमध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचसोबत देव दिवाळीच्या दिवशी दिपदान करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. या दिवसाचं विशेष महत्त्व पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. असं मानलं जातं की, या दिवशी सगळे देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात.


देव दिवाळीच्या दिवशी दीप दानाचं महत्त्व :


देव दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दीप दान करणं शुभं मानलं जातं. खासकरुन मंदिरांमध्ये दीप दान करण्यात येतं. या दिवशी मंदिरांमध्ये दीप दान करावं, असं थोरामोठ्यांकडूनही अनेकदा सांगण्यात येतं. यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते. देव दिवाळी कार्तिक मासच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी रविवारी, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार असून सोमवार 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असणार आहे.


मातीचे दिवे करा दान


मातीचे दिवे दान करण्याला या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी दिवे दान केल्यानं भगवान विष्णु प्रसन्न होतात, असं मानलं जातं. तसेच जीवनात सुख आणि समृद्धि येते. या दिवशी मंदिर, पिंपळाचं झाड, तलावाच्या ठिकाणी दीपदान केलं जातं. परंतु, मंदिरात दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.


काशीमध्ये देव एकत्र येतात


पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, या दिवशी काशीमध्ये सर्व देव एकत्र पृथ्वीवर अवतरले होते. त्यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. यामागे एक कारण होतं, ते म्हणजे, असं सांगण्यात येतं की, देवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला कंटाळून या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर भगवान शंकराने त्या राक्षसाचा वध केला होता. ज्यामुळे देव अत्यंत प्रसन्न झाले होते. सर्व देव भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये पोहोचले. त्यांनी काशीमध्ये सर्वत्र दीप प्रज्वलन केलं. आजही ही परंपरा कायम आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आजही येथे दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.