ठाणे : हृदय प्रत्यारोपणासाठी जेव्हा एखाद्याच्या शरीरातून हृदय बाहेर काढले जाते, तेव्हा ते जीवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना तारेवरची करसरत करावी लागते. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील प्रत्येक क्षण डॉक्टरांसाठी महत्त्वाचा असतो. हा क्षण वाचवण्यासाठी मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पीटलने पुढाकार घेतला असून, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.

 

कार्डियाक ट्रान्सप्लांट टीमचे हेड डॉ. अन्वय मुळे यांनी फोर्टिस रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''हृदयाचे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग फोर्टिस रुग्णालय आयआयटीसोबत करणार आहे. या प्रयोगामुळे वाहतूक कोंडीमुळे खर्च होणारा वेळ वाचणार आहे. हृदयाचे वजन अतिशय कमी असते. तेव्हा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत आम्हाला वेळेशीच संघर्ष करावा लागतो.''

 

ते पुढे म्हणाले की, '' सध्या या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असून, यासाठीची आवश्यक परवानगी लवकरच विविध संस्थांसोबतच, पोलीस आणि विमानतळ प्रशासानाकडून घेण्यात येणार आहे.''

 

जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास हृदयाचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना वेळेची बचत होणार आहे. गेल्या एका वर्षात मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात 23 हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. मुळेंनी यावेळी दिली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा होते. त्यांनी यावेळी बोलताना उपस्थितांना अवयव दानाचे महत्त्व सांगून, यासाठी अवाहनही केले, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीने डोळे दान केले असल्याची माहिती यावेळी दिली.