Best Destination In Mumbai : ऐन पावसाळ्याच्या मोसमात राज्यात एकीकडे सत्तांतराचे नाट्य सुरु असताना राजकीय वर्तुळात झाडी आणि डोंगर चर्चेचा विषय बनले आहेत. फक्त आमदारच कशाला हिरवीगार झाडी आणि हिरवेगार डोंगर म्हटल्यावर अगदी सामान्य माणसालाही अशा ठिकाणी भटकंतीचा मोह आवरत नाही. पावसाळ्याच्या या मोसमात डोंगरांनी हिरवीगार शाल पांघरली आहे. तुम्ही मुंबईत राहत असाल, आणि पावसाळ्यात अशाच ठिकाणी भटकंतीचा प्लॅन करत असाल. तर ही बातमी नक्की वाचा. मुंबईकरांसाठी अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अशाच काहीशा निसर्गरम्य ठिकाणांची माहिती खास एबीपी माझाच्या वाचकांसाठी.
1. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबईतील हिरवेगार डोंगर आणि हिरवीगार झाडी म्हटल्यावर पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे बोरीवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क. मुंबईला ऑक्सिजन पुरवणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबईचं हृदय असंही म्हटलं जातं. घनदाट जंगल, हिरवेगार डोंगर आणि ऐतिहासिक कान्हेरी गुफांमुळे हा परिसर नेहमीच आकर्षण ठरत असतो. नॅशनल पार्कमध्ये अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन होते. कान्हेरी गुफांजवळ असलेल्या धबधब्यातही वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येतो.
कसे जाल?
पश्चिम रेल्वे मार्गवरील बोरीवली रेल्वे स्थानकात उतरावे. तिथून रिक्षा किंवा बेस्ट बसने तुम्ही नॅशनल पार्क गाठू शकता.
2. येऊर : ठाण्यातील शांत आणि निसर्गरम्य परिसर अशी येऊरची ओळख आहे. त्यामुळे येऊर हिल स्टेशनही तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. हिरवेगार डोंगर, त्यातून नागमोडी वळणे घेणाऱ्या पायवाटा पर्यटकांना आपलंसं करतात. येऊर हिलवर भटकंती करताना विविध प्रकारचे पक्षी आपल्या नजरेस पडतात.
कसे जाल?
ठाणे रेल्वे स्थानकातून बस किंवा रिक्षाने येऊर गाठता येतं.
3. तुंगारेश्वर : पावसाळ्यात एखाद्या जंगलात फिरण्यासाठी तुम्ही जर एखादे शांत ठिकाण शोधत असाल तर तुंगारेश्वर तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. हिरवाईने नटलेला परिसर, डोंगररांगा आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांमुळे वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत प्राचीन शिवमंदिरही आहे.
कसे जाल?
पश्चिम रेल्वे मार्गवरील वसई रेल्वे स्थानकात उतरावे. तिथून रिक्षाने थेट तुंगारेश्वर डोंगराचा पायथा गाठू शकता. किंवा वसई पूर्वेला तुंगारेश्वर फाटा भागात जाणारी बस पकडावी.
4. माथेरान : मुंबई जवळील प्रसिध्द हिल स्टेशन अशी माथेरानची ओळख आहे. इथे असलेले डोंगर, लाल मातीतून जाणाऱ्या पायवाटा आणि दाट झाडीमुळे तीनही ऋतूंमध्ये ईथे प्रसन्न वातावरण असते. माथेरानच्या डोंगरावर धावणारी टॉय ट्रेन हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी टॉय ट्रेन अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावत आहे. लुईसा पॉइंट, शार्लोट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट ही ठिकाणे विशेष आकर्षण आहेत.
कसे जाल?
माथेरानला ला जाण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ रेल्वे स्थानकात उतरावे. तिथून अमन लॉजपर्यंत वाहनाने जाता येते. अमन लॉज ते माथेरान टॉय ट्रेन, घोडे किंवा चालत गाठू शकता.
5. कर्नाळा : मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा हे पनवेल जवळ असलेले एक पक्षी अभयारण्य आहे. तुम्ही जर पक्षी प्रेमी असाल तर हे तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकते. कर्नाळा किल्ला गिरी प्रेमिंचे खास आकर्षण. कर्नाळा किल्ल्याचा सुळका हा विशेष लक्षवेधी आहे. हा सुळका अंगठ्यासारखा भासतो.
कसे जाल?
पनवेल बस स्थानकातून पेण, अलिबागला जाणारी कोणतीही एस.टी. बस कर्नाळ्याला जाते. प्रवेशद्वारापासून किल्ल्यावर जाण्यास जवळपास दोन तास लागतात.
तुम्ही खासगी वाहनानेही कर्नाळा गाठू शकता.
महत्वाच्या बातम्या :
‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा