मुंबई : प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा अशी अपेक्षा असते. यासाठी प्रत्येक जण काहीतरी उपाय करत असतो. बाजारामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधनं उपलब्ध आहेत. जी वेळोवेळी त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत दावा करत असतात. एवढंच नाहीतर त्वचेच्या विविध समस्यांसाठी वेगवेगळी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला माहित आहे का? घरगुती उपायांनीसुद्धा आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो. घरगुती उपायांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढतेचं पण मुख्य म्हणजे यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. आज आपण अशाच घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत.
दुधावरची मलई
जर कुणाच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी असल्यास त्यांनी ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी मालिश करावी. हा उपाय दररोज केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.
बेसन, चंदन आणि पीठाचं मिश्रण
बेसन, चंदन आणि पीठ एकत्रीत करुन त्यांचं मिश्रण चेहऱ्यावर लावावं. यात आपण हळदीच्या पावडरचा वापर देखील करु शकतो. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसायला लागतो.
मुलतानी मातीचा फेसपॅक
मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सुंदर दिसू लागतो. तसेच त्वचा देखील तजेलदार होते. जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होतो.
तिळाच्या तेलाची मालिश
तिळाच्या तेलाची रोज मालिश केल्यास चेहरा उजळून दिसायला लागतो. चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ करण्यासाठी तिळाच्या तेलाची मदत होते. या तेलामुळे चेहऱ्यावरील डागदेखील निघून जातात. दररोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करावी आणि सकाळी पाण्याने धुवावे.
बदाम तेल
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.
टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.
संबंधित बातम्या :
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स; होतील भरपूर फायदे
नाश्त्यासाठी पोहे खाल्याने होऊ शकतं वजन कमी; पण कसं?
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा