Healthy Makhana Modak Recipe : गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. सजावटीपासून ते देखाव्यांची तयारी करण्यात धामधूम सुरू आहे. या सर्व धामधूमीत  गणपती बसल्यानंतर दहा दिवस गणपतीसाठी वेगवेगळी प्रसाद  म्हणून काय करायचं असा प्रश्न पडतो. उकडीचे, तळलेले  मोदक तर आपण नेहमीच करतो. पण त्यात काही नाविन्य हवं. म्हणून आज आम्ही मखान्यांच्या मोदकाची अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. मखान्यांचे पदार्थ करायला अगदी सोपे आणि कमी वेळात होतात. 


मखाना मोदक करण्यासाठी लागणारे साहित्य



  • मखाना - एक कप

  • तूप - 1 चमचा

  • बदाम - 5 ते 6

  • काजू - 6 ते 7

  • खवलेला नारळ - दोन चमचे

  • पिस्ता - दोन ते तीन

  • फुल क्रीम दूध - अर्धा लीटर

  • साखर -3/4 कप

  • छोटी वेलची  - चार 


मखाना मोदक बनविण्याची पद्धत



  • मखाना मोदक बनवण्याकरता एक पॅनमध्ये मंद आचेवर मखाने हलकं भाजून घ्या. जेव्हा मखान्याचा रंग बदलेल तेव्हा मखाने एका वाटीत काढून घ्या

  • आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून यात  बदाम आणि काजूचे  तुकडे परतावे

  • त्यानंतर यामध्ये नारळाचा खीस घालावा आणि पिस्ता भाजून घ्यावे

  • एका भांड्यात दूध उकळावे. तोपर्यंत भाजलेले मखाने मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे

  • 15- 20 मिनिटानंतर दूधात साखर मिसळावी आणि दूध निम्मे आटवावे

  • त्यानंतर मखान्याची पावडर आणि सुकामेवा दूधात घालावी

  • या संपूर्ण मिश्रणात वेलची पावडर मिसळून जाडसर मळून घ्यावे

  • आता मोदकाच्या साच्याला तूप लावून मोदक तयार करावे

  • तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले. 


बाप्पाचं आगमन यंदा कधी होणार? 


यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे.