Health Tips : हल्ली लोकांना हृदय, रक्तदाब, शुगर, पक्षाघात यांसारखे आजार अगदी लहान वयातच होऊ लागले आहेत. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव आणि दारू सिगारेटसारख्या धूम्रपानाच्या सवयी हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजारांचा दीर्घकाळापर्यंत शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. असंतुलित अन्न खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत हृदयाला निरोगी ठेवणाऱ्या गोष्टींचा आहारात नक्कीच समावेश करावा.

निरोगी हृदयासाठी योग्य फळे, भाज्या, धान्ये आणि नट्स खाणे आवश्यक आहे. चला तर, हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेऊया...

फळे : सर्व फळे जरी आरोग्यासाठी चांगली असली, तरी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायबर युक्त फळांचे सेवन करावे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. सफरचंद आणि लिंबूवर्गीय फळे खावीत, त्यात विरघळणारे फायबर अर्थात पेक्टिन असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय बेरी आणि द्राक्षे नक्कीच खावीत. निरोगी हृदयासाठी तुम्ही एवोकॅडो देखील खाऊ शकता. एवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते.

भाज्या : हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. जेवणात पालक हिरव्या भाज्या अवश्य खाव्यात. त्यात ल्युटीन आणि कॅरोटीनोइड्स असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तुम्ही तुमच्या आहारात भेंडी, वांगी, बीन्स आणि टोमॅटो यांचाही समावेश केला पाहिजे.

तृणधान्ये : आहारात तृणधान्यांचे सेवन अधिकधिक करावे. हे भरपूर फायबर प्रदान करते आणि शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी करते. यासाठी, तुम्ही ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. त्याच वेळी, व्हिटॅमिन बी आणि फायबर समृद्ध क्विनोआ देखील खाऊ शकता.

कडधान्ये : सर्व कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर जास्त असते. जेवणात कडधान्ये नियमित खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही, याशिवाय कडधान्ये ही व्हिटॅमिन बी चा चांगला स्रोत आहे.

नट्स आणि बिया : अक्रोड हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-3, कॉपर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. जे तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत बनवतात. याशिवाय सब्जा, आळशी, भोपळ्याच्या बिया आणि टरबूजाच्या बिया देखील खाव्यात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :