मुंबई : भारतीय रेल्वे विभागान असिस्टंट लोको पायलट या पदासाठीच्या रिक्त जागांची संख्या तिपटीने वाढवली आहे. अगोदर 5696 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात होती. याच जागा आता तब्बल 18799 जागांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांना आता आणखी एक नवी संधी प्राप्त झाली आहे.  


5696 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यासाठी निघाली होती अधिसूचना


भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने नुकतेच एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत असिस्टंट लोको पायलट या रिक्त पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने अगोदरच एक अधिसचूना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार एकूण 5696 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे सांगितले होते. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते.मात्र आता असिस्टंट लोको पायलट या रिक्त पदांची संख्या आता वाढवण्यात आली आहे. नव्या अधिसूचनेनुसार आता या रिक्त पदांची संख्या थेट 18 हजार 799 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जानेवारी महिन्यातील अधिसूचनेच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या आता तिपटीने वाढली आहे. रेल्वे विभागाच्या वेगवेगळ्या विभागांत ही पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. 


RRC ALP Railway Recruitment 2024 : वयोमर्यादा


रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी पात्र उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. यासाठी उमेदवाराने अधिकृत अधिसूचनेतील तपशील पाहावा.


RRC ALP Railway Recruitment 2024 : पगार किती मिळेल?


या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 19 हजार 900 रुपये वेतन दिले जाईल.


RRC ALP Railway Recruitment 2024 : निवड कशी होईल?


असिस्टंट लोको पायलट होण्यासाठी, उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यामध्ये संगणक आधारित चाचणी (CBT),  संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.


RRC ALP Railway Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे दाखल कराल?


भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी. उमेदवारांनी होमपेजवरील लोको पायलट भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा. अर्जामध्ये योग्य माहिती प्रविष्ट करून अर्ज दाखल करा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्जाची फी भरा. यानंतर दाखल केलेल्या अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.


हेही वाचा :


Job Majha : अणु उर्जा विभागात नोकरीची संधी, वयोमर्यादा काय?


निवृत्तीचे वय वाढण्याच्या मागणीला कडाडून विरोध, विद्यार्थी संघटना, नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!