मुंबई : महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गेल्या दोन दिवसांमध्ये चार जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. एमपीएससीकडून काल नगरविकास विभागातील एकूण 208 जागांसाठी दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या.  यामध्ये  सहायक नगर रचनाकार या गट ब मधील पदासाठी आणि  नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय आयोगानं महाराष्ट्र शिक्षण सेवा याद्वारे प्राध्यापक पदाच्या 32 जागांसाठी जाहिरात दिली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार या श्रेणी-एकच्या गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलेली आहे.  


महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ  या पदाची देखील भरती केली जाणार आहे. नगर रचनाकारच्या 60 पदांच्या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय आयोगानं महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ विविध विषयांमधील प्राध्यापक पदासाठी देखील  जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याद्वारे 32 जागा भरल्या जाणार आहेत. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. ज्या उमेदवारांना या पदांच्या भरतीसाठी अर्ज दाखल करायचे असतील त्यांनी प्रथम जाहिरात वाचून घेणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता, परीक्षेचं स्वरुप, ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत दाखल करायचा यासंदर्भातील माहिती या सर्व बाबी जाहिरातीमध्ये मिळतील. 


गट ब आणि गट क सेवेच्या 1815 जागांसाठी जाहिरात


महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन दिवसांपूर्वी  महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधून 1333  पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. याशिवाय  महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  


महाराष्ट्र गट-क सेवेतील उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक ,बेलिफ लिपीक, गट क नगरपाल  मुंबई, लिपिक टंकलेखक ही पदं भरली जाणार आहेत. तर,महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा गट ब मधील सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदं भरली जाणार आहेत.


इतर बातम्या :


MPSC Exam : PSI, कर सहायक ते लिपीक टंकलेखक पदांची भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध, 1815 जागा भरणार