मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागानं काही दिवसांपूर्वी युवकांना प्रशिक्षण देऊन जर्मनीला पाठवण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. युवकांना जर्मनीत वाहनचालक पदावर काम करण्यासाठी तिकडे जाण्यासाठी प्रशिक्षण आणि इतर मदत करण्याबाबत निर्णय घेतला होता. आता राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून  बांधकाम कामगारांना इस्त्रायलला पाठवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. 


इस्त्रायलमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळं अस्थिरतेचं वातावरण आहे. मात्र, याचवेळी तिथं बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. या गोष्टीचा विचार करुन राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.  कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागानं अर्ज मागवले आहेत. 


हमास आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु असल्यानं त्याचा परिणाम बांधकामांवर झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकामं रखडली आहेत. काही कंपन्यांनी कामगार कपात केल्यानं बांधकाम कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं इस्त्रायलमध्ये बांधकाम कामगारांना संधी निर्माण झाली आहे. 


याच गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारचा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनल यांच्यावतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या मंत्रालयानं  बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कामगारांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. 


 जे बांधकाम कामगार इस्त्रायलला जाण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.


नेमक्या अटी कोणत्या?


कुशल बांधकाम कामगारांना इस्त्रायलला जायचं असल्यास त्यानं दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असलं तरी चालेल. कामगाराचं वय 25-45 दरम्यान असलं पाहिजे. राज्यामध्ये जिल्हा सत्रावर नोंदणी सुरु असल्याची माहिती आहे.


वाहनचालकांना जर्मनीला पाठवणार


महाराष्ट्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी जर्मनीतील बाडेन-वूटेनबर्ग या राज्यांशी सामंजस्य करार केला होता त्यानुसार कुशल मनुष्यबळ पुरवले जाणार होते. महाराष्ट्रातून वाहनचालक पुरवण्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपवण्यात आली होती. त्यानुसार ट्रक, बस, हलकी व जड वाहने चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून कुशल प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर त्यांना जर्मनीला पाठवलं जाईल.  जर्मनीत वाहन चालवण्यासाठी वाहनचालकांना दरमहा अडीच लाख रुपये त्याप्रमाणं वार्षिक 30 लाख रुपये मिळू शकतात. 


इतर बातम्या : 



 

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, 250 जागांसाठी अर्ज मागवले, कोणत्या पदांसाठी भरती?