IT Hardware PLI Scheme: आयटी हार्डवेअर (IT Hardware) क्षेत्रात लवकरच नव्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आयटी क्षेत्रातील दिग्गज डेल (Dell), एचपी (HP), लेनोवो (Lenovo), फॉक्सकॉन (Foxconn) इत्यादी 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. PLI IT हार्डवेअर योजनेद्वारे (PLI Hardware Scheme)  एकूण 27 कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. 


23 कंपन्या उत्पादन सुरू करतायत 


बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अश्विनी वैष्णव यांनी असंही सांगितलं की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास 95 टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा परिस्थितीत 23 कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या 90 दिवसांत या योजनेअंतर्गत उत्पादन सुरू करतील.


3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार


अश्विनी वैष्णव म्हणाले की, हे आम्हाला पीसी, सर्व्हर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या निर्मितीमध्ये एक प्रमुख शक्ती बनण्यास फायदेशीर ठरेल. या 27 कंपन्या 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. ज्या कंपन्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यात डेल, फॉक्सकॉन, एचपी आणि लेनोवो या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.


32 कंपन्यांनी अर्ज केलेले


सरकारच्या सुधारित माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर प्रोत्साहन (PLI) योजनेचा परिणाम म्हणून, भारतातील एकूण 32 कंपन्यांनी वैयक्तिक संगणक (PC), लॅपटॉप, टॅब्लेट, सर्व्हर आणि एज कॉम्प्युटिंगचे उत्पादन सुरू करण्यास स्वारस्य व्यक्त केलं आहे. या यादीत डेल, हेवलेट पॅकार्ड, फॉक्सकॉन, असुस, एसर आणि फ्लेक्ससह जगातील सर्वात मोठ्या पीसी निर्मात्यांचा समावेश आहे.


50 हजाराहून अधिक नव्या रोजगाराच्या संधी 


आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आशा व्यक्त केली की, या 27 कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेद्वारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी हार्डवेअरमध्ये करतील. या गुंतवणुकीतून एकूण 50,000 लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण 1.50 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणं अपेक्षित आहे. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यात डेल (Dell), फॉक्सकॉन (Foxconn), लेनोवो (Lenovo), फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, पेजेट, सोजो, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे, देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना 2.0 सुरू केली आहे. याद्वारे, सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या क्षेत्रात नवे रोजगार निर्माण करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करेल.