मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल मायदेशी परतला आहे. गेलच्या घरी 'नवा पाहुणा' येणार आहे, त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी गेल जमैकाला गेला आहे. त्यामुळे गेल आयपीएलमधील बंगळुरूच्या दोन सामन्यांना मुकणार आहे.

 

गेलची पत्नी नताशा बॅरिज पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. गेलने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर त्याचा विमानातील फोटो अपलोड केला आहे, त्याखाली गेलने "बेबी मी माझ्या वाटेवर आहे", असं लिहिलं आहे.

 

गेलच्या अनुपस्थितीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्याची कमतरता भासेल. मात्र सध्या आयपीएलमध्ये गेल फॉर्ममध्ये नसल्याचंच दिसून येतंय. कारण गेलने पहिल्या सामन्यात 1 आणि दुसऱ्या सामन्यात भोपळाही न फोडता माघारी परतला.

 

आता बंगळुरुचा संघ 20 आणि 22 एप्रिलच्या सामन्यात गेलशिवाय मैदानात उतरेल. गेल 25 एप्रिलला भारतात परतून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात सहभागी होईल असं सांगण्यात येत आहे.