महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात 8 ते 10 सभा घेणार असल्याचं त्यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत सांगितलं. मोदी-शाह ही जोडी देश खड्ड्यात घालत असून त्यांच्यापासून देशाला वाचवण्यासाठी 'भाजपला मत देऊ नका' असं राज ठाकरे राज्यभर सांगणार आहे. राज ठाकरेंच्या या सभांचा राज्यातील जनमानसावर किती परिणाम होईल हे लोकसभेचे निकाल आल्यावर समजेलच पण निवडणुक न लढवणाऱ्या मनसेसाठी राज ठाकरेंनी अशा प्रकारे सभा घेणं आणि केंद्रातील भाजपचं सरकार जाणं हे नक्की फायद्याचं ठरु शकतं.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपचं सरकार पडतं की पुन्हा सत्तेवर येतं यावर महाराष्ट्रात काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेची बरीच गणितं अवलंबून आहेत. गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक मोठी आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. सध्याच्या सरकारवर राज्यातील अनेक घटक वेगवेगळ्या कारणांनी नाराज आहेत. परंतू या नाराजीचं मतात रुपांतर करणं विरोधकांना जमलेलं दिसत नाही. त्यामुळं कदाचित केंद्रातील सरकार पडल्यास राज्यात तशी हवा निर्माण होऊन राज्यात त्याचा फायदा होईल या आशेवर अनेक जण आहेत. 2014 साली देशातील सरकार बदलल्यानंतर 4-5 महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याचा फायदाही भाजपला झाला. यावेळीही भाजपचं केंद्रातील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यात युतीचं पारडं जड राहील. राज्यात विरोधकांची पुन्हा 2014 प्रमाणेच अवस्था होऊ शकते.

केंद्रातील भाजप सरकार पडल्यास राज्यातही तशी हवा निर्माण होऊ शकते. या बदललेल्या वातावरणाचा फायदा विरोधी पक्षाला होऊ शकतो ज्याचा विधानसभेच्या निवडणुकीवेळी राज ठाकरे मोठा भाग असू शकतात. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला राज ठाकरे फायदा करून देऊ शकले तर विधानसभेसाठी जागा वाटपात मनसेला घेऊन विरोधीपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेस राष्ट्रवादी राज ठाकरेंना वापरून घेत आहे असा प्रचार भाजप करत आहे. पण राज ठाकरेंसारखा कसलेला नेता विनाकारण कोणाकडून वापरल्या जाण्यासारखा नाही. लोकसभा लढवत नसतानाही राज्यात 8-10 सभा घेणारे राज ठाकरे विधानसभेवेळी महाआघाडीतला महत्त्वाचा घटक असू शकतील.

तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीवर अजूनही लोकांचा म्हणावा तसा विश्वास दिसत नाही. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील जनतेत असलेली नाराजी विरोधी पक्षाला टिपता आली नाही. भाजप सरकार खराब कामगिरी करेल, जनता त्यांच्यावर नाराज होईल आणि मग आपल्याला निवडून देईल अशा विचारात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी 5 वर्ष काढली आहेत. त्यामुळे भाजपला मत देऊ नका असं काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितल्यापेक्षा तिसरं कोणीतरी ते सांगण भाजप विरोधी मतं मिळवण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. 2014 च्या निवडणुकीवेळी पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या मोदींचं कौतुक करणारे राज ठाकरे आज देशाला मोदींपासून मुक्त करा अशी मागणी लोकांकडे करत आहेत. तर एकेकाळी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला होता आज त्यांचा फायदा होत असेल तर होऊ द्या, असंही राज ठाकरे म्हणत आहेत. मोदींच्या 'गुजरात मॉडेल'चं कौतुक करणारे राज ठाकरे त्यावेळी कसं फसवलं गेलं हे त्यांच्या सभांमधून सांगताना दिसत आहेत.  पुलवामा, एअर स्ट्राईक सारख्या मुद्द्यांवर विरोधीपक्ष काही बोलले की भाजपकडून त्यांच्यावर सरळ देशद्रोही असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे या मुद्द्यावर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघडपणे बोलत नाहीत. याउलट राज ठाकरे मात्र वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत.  यासह इतर अनेक मुद्द्यांवर ज्या आक्रमकतेने राज ठाकरे सध्या भाजप विरोधात प्रचार करत आहेत, वेगवेगळ्या मुद्दयांवर सरकारला घेरत आहेत ते विरोधकांना फायद्याचं ठरु शकतं.

प्रत्येक राजकीय पक्षाचा संघर्ष हा सत्तेपर्यंत जाण्यासाठी सुरु असतो. सत्तेशीवाय कोणताही राजकीय पक्ष जास्त काळ तग धरू शकत नाही. सत्तेशिवाय नेत्यांचं कदाचित भागत असेल पण कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी कुठे तरी कधी ना कधी सत्ता पाहिजे असते. देशातील आणि राज्यातील एकूण वातावरण पाहता मनसेला एकहाती सत्ता राज्यात मिळवणं अतिशय अवघड दिसतं. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी या स्थानिक पक्षांची पाळंमुळं राज्यात खोलवर रुजलेली असताना आणि भाजप आणि काँग्रेस या मोठ्या पक्षांसोबतीची त्यांची युती/आघाडी असताना मनसेला एकहाती सत्ता मिळणे अवघडच. त्यामुळे येत्या काळात मनसे महाआघाडीमध्ये  गेल्यास आणि त्यांचं सरकार आल्यास मनसेला सत्तेच्या दारापर्यंत नेण्यासाठी राज ठाकरेंची आजची भूमिका निर्णायक ठरु शकते.