मुंबई : डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं. शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसल्यास त्याचा परिणाम रक्ताभिसरण, पेशींच्या कार्यावर होतो.


केवळ तहान लागेल तेव्हाच पाणी पिण्याच्या सवयीमुळे पेशींमध्ये पाण्याची कमतरता होते आणि त्याचा मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड, पोट याच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

डिहायड्रेशनची लक्षणं

- घशाला कोरडं पडणं, सतत तहान लागणं, डोकं किंवा अंग दुखणं, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणं, त्वचा कोरडी पडणं, मलावरोध होणं, डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा ही काही डिहायड्रेशनची लक्षणं आहेत.

- मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणं, हृदयाचे ठोके वाढणं, रक्तदाब कमी होणं, वजन झपाट्याने कमी होणं ही डिहायड्रेशनची आणखी काही लक्षणं आहेत.

- ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकतं.

- उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.

- डिहायड्रेशनमुळे शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईड्स, सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड यांच्या पातळीमध्ये असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

डिहायड्रेशनवर उपाय

- डिहायड्रेशनवर मुख्य उपाय म्हणजे सतत पाणी प्यावं. सर्वसाधारपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवं.

- उन्हाळ्यात नियमित पाणी, फळं, फळांचा रस प्यायला पाहिजे, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते.

- उन्हाळ्यामध्ये दिवसातून एक ते दोनवेळा शहाळ्याचं पाणी किंवा लिंबू पाणी प्यावं.

- एक ग्लास पाण्यामध्ये साखर, चिमूटभर मीठ आणि ओआरएस टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन कमी होतं.

- कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी, काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजर या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.

- आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी दही किंवा ताकाचा आहारात समावेश करावा.