Zee Gaurav 2022 : तब्बल दोन दशकांहूनही जास्त काळ झी मराठी ही वाहिनी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे. मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली 21 वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांचा गौरव झी मराठी ही वाहिनी आवर्जून करते. यंदाचा ‘झी गौरव’ (Zee Mahagaurav 2022) हा विशेष आहे, कारण या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात येणार आहे. हा महागौरव सोहळा म्हणजे प्रेक्षकांची मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.


‘झी महागौरव’ या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातील चित्रपटांमधील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शकांचा यांचा केलेला गौरव प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘सैराट’, ‘जोगवा’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘बिनधास्त’, ‘मृगजळ’, ‘एक होती वाडी’, ‘भेट’, ‘श्वास’, ‘उत्तरायण’, ‘आम्ही असू लाडके’, ‘मिशन चॅम्पियन’, ‘एवढंसं आभाळ’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘शाळा’, ‘बालक पालक’, ‘अवताराची गोष्ट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘मुरंबा’, ‘नाळ’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांमध्ये चुरस रंगली.


मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर सचिन पिळगांवकर सर्वोत्कृष्ट खलनायक!


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘जोगवा’ चित्रपटासाठी मुक्ता बर्वेची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून उपेंद्र लिमये (चित्रपट-जोगवा) आणि सुबोध भावे (चित्रपट-कट्यार काळजात घुसली) यांना पुरस्कार विभागून देण्यात आला. तर, नागराज मंजुळेला ‘सैराट’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगांवकर यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा (चित्रपट-कट्यार काळजात घुसली) पुरस्कार मिळाला.


नृत्याविष्काराने सोहळ्याला लागणार चार चांद!


या सगळ्या चित्रपटांमधून सर्वोत्तम चित्रपट निवडणे हे काही सोपं नव्हतं, त्यामुळे कुठला चित्रपट सर्वाधिक पुरस्कार पटकावून महागौरवचा सन्मान पटकावतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. याच सोबत या पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका असणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि अमृता खानविलकर यांचा ‘पुष्पा’ आणि ‘सैराट’ या सुप्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यांवरील धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.



‘झी गौरव’चं गाणं हे रसिक-प्रेक्षकांच्या ओठावर रूळलेलं आहे. हे गाणं ऐकल्यावर एक वेगळाच जोश अंगात संचारतो आणि याच गाण्यावर कोरिओग्राफर मयूर वैद्य आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघे 2 वेगळ्या शैलीच्या नृत्याचा संगम सादर करणार आहेत. तसेच, ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीर हे प्रेक्षकांना त्यांच्या भन्नाट विनोदी स्किट्सने खळखळून हसायला भाग पाडतील.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha