zee 5 Marathi Series: मराठी मनोरंजनासाठी लोकप्रिय असलेल्या ZEE5 मराठीने आपल्या आगामी ओरिजिनल मालिकेचा ‘बे दुणे तीन’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही मालिका येत्या 5 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आधुनिक नातेसंबंधातील गमती-जमती, भावनिक बारकावे आणि दैनंदिन जीवनातील अनपेक्षित बदल दाखविणारे हे एक हलकंफुलकं पण मनाला भिडणारं कौटुंबिक नाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वृषांक प्रॉडक्शन्स निर्मित आणि अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले दिग्दर्शित ही मालिका पालकत्वाच्या प्रवासातील भावनिक, विनोदी आणि अनपेक्षित अनुभवांची गुंफण आहे .
तगडी स्टारकास्ट, दमदार कथा
या मालिकेत दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोटे यांच्यासह क्षितीश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवाणी रांगोळे महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. कथा आहे अभय आणि नेहा या तरुण जोडप्याचीज्यांच्या आयुष्यात एकाऐवजी एकदम तीन बाळ येणार असल्याचे कळताच त्यांच्या आयुष्याचे संपूर्ण समीकरणच बदलते.
अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले यांनी दिग्दर्शित केलेली आणि वृषांक प्रॉडक्शन्स निर्मित ही मालिका जिव्हाळा, विनोद आणि वास्तवतेचा सुंदर समतोल साधते. कथानकातील अभिनय, पात्रांची पकड आणि कथेमध्ये दडलेली भावनिक खोली प्रेक्षकांच्या मनाशी नक्कीच भिडेल.
भावना, गैरसमज आणि प्रेम
प्रारंभीचा धक्कादायक खुलासा, त्यानंतर येणारा गोंधळ, गैरसमज, भावना आणि नव्याने वाढत जाणारे प्रेम हे सगळं भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन काळांमध्ये गुंफलेल्या कथनशैलीत उलगडत जाते. लग्नानंतरच्या नात्यांमध्ये घडणारे बदल आणि पालकत्वाची अपरिहार्य जबाबदारी यांची गुंतवळ मालिकेत अत्यंत कलात्मकरीत्या दाखवली आहे.
ZEE5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा व्ही.आर. म्हणाल्या "मराठी ZEE5 वर आम्ही अशा कथा मांडतो ज्या घराघरातील वास्तवाशी जोडलेल्या असतात, हसवतात, विचार करायला लावतात आणि मनाला स्पर्श करून जातात. ‘बे दुणे तीन’ ही अशीच कथा आहे. नातेसंबंधांमधील अनागोंदी आणि प्रेमाचा सुंदर संगम या मालिकेतून दिसून येतो. अभय-नेहाचा प्रवास प्रेक्षकांना आपल्या आयुष्याची आठवण करून देईल. ही फक्त पालक होण्याची कथा नाही, तर पालकत्वात एकमेकांना नव्याने शोधण्याचा प्रवास आहे. 5 डिसेंबरला ही मालिका प्रेक्षकांसाठी सादर करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे."
वृषांक प्रॉडक्शन्सच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया:
*"‘बे दुणे तीन’ची कल्पना करताना आम्हाला नात्यातील प्रेम आणि जबाबदारी यामधील सूक्ष्म रेषा टिपायची होती. एखाद्या जोडप्याला एकदम तीन बाळं होणार असल्याची बातमी हीच स्वतःमध्ये आयुष्याची अनिश्चितता आणि विनोदाचे एक उत्तम प्रतीक आहे. मालिकेत हसणे, चिडचिड, निराशा आणि प्रेम अशा प्रत्येक भावना एकत्र अनुभवायला मिळतात. ZEE5 सोबत काम करताना सकारात्मक आणि सर्जनशील अनुभव मिळाला असून, ही कथा प्रेक्षकांसमोर येण्याची आम्हाला आतुरता आहे."
दिग्दर्शक जोडी अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले म्हणाले,"आमचे उद्दिष्ट होते एक सिनेमा-भाव असलेली, पण प्रत्येक जोडप्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसेल अशी कथा सांगण्याचे. अभय-नेहाचे नाते गोड, अपूर्ण आणि वास्तववादी आहे ते चुकतात, भांडतात, पण प्रेम त्यांच्या नात्याची खरी ओळख आहे. अनेक काळांमध्ये सांगितलेले कथानक त्यांच्या नात्यातील हसू, वेदना आणि जीवनातील छोट्या-मोठ्या क्षणांची सुंदर गुंफण दाखवते. साधेपणातील विनोद आणि दैनंदिन जगण्यामध्ये दडलेली मृदुता पकडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."
अभयची भूमिका साकारणारा क्षितीश दाते म्हणाला
"‘बे दुणे तीन’ ही कथाच इतकी वास्तवभासक आहे की अभयचे पात्र करताना मला अनेक नवे, मजेशीर आणि अत्यंत रिलेटेबल क्षण अनुभवायला मिळाले. एका क्षणातच तीन बाळांचा बाप होण्याचा धक्का नैसर्गिक अनागोंदी निर्माण करतो, पण त्यामागे एक कोमल भावविश्वही दडलेले आहे. मला खात्री आहे की प्रत्येक जोडपे आणि कुटुंब या प्रवासात स्वतःला कुठेतरी ओळखेल. प्रेक्षकांना अखेरीस ही मालिका पाहायला मिळणार याचा मला खूप आनंद आहे."