Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा पसरत आहेत. पाकिस्तानी लष्कराने त्यांना विष देऊन मारल्याच्या अफवा सोलश मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. त्याचवेळी इम्रान खान यांच्या बहिणींनाही इम्रान खान यांची भेट घेऊ दिली जात नाही. इम्रान खान हे पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षाचे संस्थापक असून रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात (Adiala Jail) 2023 पासून कारावास भोगत आहेत.
पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान यांना विष दिलं आणि तुरुंगातच मारल्याचा दावा केला जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून इम्रान खान यांना कुणालाही भेटू दिलं जात नाही. आताही इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनादेखील त्यांची भेट घेऊ दिली जात नाही. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे.
बहिणींना पोलिसांकडून मारहाण (Police Assault Allegations)
इम्रान खान यांच्या बहिणी तुरुंगाबाहेर शांततापूर्ण आंदोलनासाठी बसल्या असताना पोलिसांनी अचानक त्यांच्यावर लाठीहल्ला केल्याचा पीटीआयचा (PTI) आरोप आहे. 'आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. कोणत्याही रस्त्याला अडथळा आणला नाही. तरीदेखील स्ट्रीटलाइट्स बंद करून अंधारात आम्हांवर पोलिसांनी नियोजित हल्ला केला' असे नुरीन नियाझी यांनी पत्रात म्हटले आहे. 71 वर्षीय नुरीन यांना पोलिसांनी केसांना धरून रस्त्यावर ओढत नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतर महिलांवरही लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलिसांविरोधात चौकशीची मागणी (Demand for Inquiry)
इम्रान खान यांच्या बहिणींनी पाकिस्तानमधील पंजाबचे पोलीस महासंचालक उस्मान अन्वर यांना पत्र पाठवून संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षांत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भेटीस बंदी आणि वाढते प्रश्न (Ban on Meetings)
इम्रान खान यांना ऑगस्ट 2023 पासून विविध खटल्यांत शिक्षा झाल्यानंतर आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात कोणालाही त्यांच्या भेटीची परवानगी देण्यात आली नाही, असे पीटीआयचे म्हणणे आहे. त्यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर सुरू असताना भेटीवरची ही बंदी संशय वाढवणारी ठरत आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनीही सात वेळा भेटीचा प्रयत्न केला, मात्र तुरुंग प्रशासनाने प्रत्येक वेळेस प्रवेश नाकारला. आताही तेच केले जात असल्याचं चित्र आहे.
