Zapatlela 3 Updates :   मराठी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारा 'झपाटलेला' (Zapatlela 3 Movie) चित्रपटाचा आता तिसरा भाग येऊ घातला आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 'झपाटलेला 3' (Zapatlela 3 ) मध्ये नवीन काय असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) दिसण्याची शक्यता आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही किमया साधली जाणार असल्याची चर्चा आहे. 


'झपाटलेला' चित्रपट हा 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे,  विजय चव्हाण, रविंद्र यांची धमाल कॉमेडी, महेश कोठारे यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टर महेश जाधवची धडक कारवाई आणि बाहुल्यात असलेला  खलनायक तात्या विंचू यांनी सिनेरसिकांचे चांगलेच मनोरंजन करत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. त्यानंतर जवळपास 20 वर्षानंतर 2013 मध्ये 'झपाटलेला 2' रिलीज झाला. यामध्ये आदिनाथ कोठारे हा लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलाच्या भूमिकेत दिसला. तर, तात्या विंचू पुन्हा जिवंत झाला असल्याचे दाखवण्यात आले. या चित्रपटासाठी '3 डी' तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. 


तिसऱ्या भागात लक्ष्मीकांत बेर्डे?


'झपाटलेला 3' चित्रपटाच्या निर्मितीच्या हालचालीला वेग आला आहे. हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या चित्रपटाची सगळ्यांना प्रतिक्षा आहे. या तिसऱ्या भागात लक्ष्मीकांत बेर्डेदेखील दिसणार आहेत. आर्टिफिशयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर दिसणार आहेत. निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात याबाबतचे सूतोवाच केले असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिले. या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून लक्ष्मीकांत बेर्डेचे पात्र पुन्हा पडद्यावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 


तात्या विंचू हा खलनायकी बाहुल्याला दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या आवाजाने वेगळ्याच उंचीवर नेले. पडद्यावर दिसणारा बाहुला आणि त्याच्या कृत्याला मनात धडकी भरवणारा आवाज यामुळे तात्या विंचू आजही लोकप्रिय आहे. आता 'झपाटलेला 3' हा भाग तांत्रिकदृष्ट्या अधिक भक्कम करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने काही तांत्रिक गोष्टीसाठी आपण ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


इतर संबंधित बातम्या :