Yuzvendra Chahal Post: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या पत्नीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे (Divorce Rumors) चर्चेत आहे. पण, अजून त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) किंवा युजवेंद्र चहल दोघांपैकी कोणीच घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, चहल आणि त्याच्या पत्नीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे. अशातच, गेल्या कित्येक वर्षांपासून युजवेंद्र चहल टीम इंडियाच्या बाहेर आहे. सर्व चर्चांमध्येच आता युजवेंद्र चहलनं सोशल मीडियावर एक पोस्ट करुन सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे.
क्रिकेटर युजवेंद्र चहलनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, या स्टोरीमध्ये त्यानं देवाचे आभार मानले आहेत. सध्या चहलच्या स्टोरीवरुन चर्चांना उधाण आलं आहे.
युजवेंद्र चहलनं स्टोरी शेअर करताना काय लिहिलंय?
युजवेंद्र चहलनं स्टोरी शेअर करताना लिहिलं आहे की, "मी जितकं पाहू शकतो, तितक्या वेळा देवानं माझं नेहमीच रक्षण केलं आहे. त्यामुळे मी त्या वेळेची केवळ कल्पनाच करू शकतो, ज्यावेळी मला वाचवण्यात आलं, ज्याबाबत मला माहीतच नव्हतं. माझ्यासोबत नेहमी राहण्यासाठी देवाचे आभार, तेव्हाही मला याबाबत काहीच माहीत नव्हतं."
चहल-धनश्रीकडून इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो
चहल आणि धनश्रीमध्ये सध्या काहीच ठीक नसल्याचं बोललं जात आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, अजून दोघांपैकी कुणीच याबाबत जाहीरपणे बोललेलं नाही. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आणि दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, चहलच्या फॅन्सनी दावा केला आहे की, घटस्फोटावेळी चहलला त्याची पत्नी धनश्री वर्माला तब्बल 60 कोटींची पोटगी द्यावी लागणार आहे.
चहलची आजवरची कारकीर्द
युजवेंद्र चहलनं 11 जून 2016 रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जिथे त्यानं किफायतशीर गोलंदाजी केली आणि एक विकेट घेतली. त्यानं त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात शानदार कामगिरी केली आणि 25 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे संघानं 8 विकेट्सनी विजय मिळवला.
गोलंदाज म्हणून, त्यानं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 72 सामन्यांच्या 69 डावांत 27.13 च्या सरासरीनं 121 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 बद्दल बोलायचं झालं तर, या गोलंदाजानं 80 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या. एकेकाळी तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.