मुंबई : हळूहळू जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागलं आहे. अनलॉकिंगची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाकडे येऊ लागली आहे. अशात सिनेमागृहं, नाट्यगृहं पुन्हा एकदा खुली होऊ लागली आहेत. अशात आता नाट्यसृष्टीची लगबग वाढू लागली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बसलेली खीळ आता सुटणार आहे. कारण पुन्हा एकदा अटीशर्तींसह नाटकं चालू होतील. याची सुरूवात पुण्यातून होणार आहेच. पण नाट्यसंस्थांना मुंबईत नाटकं करता यावीत म्हणून काही महत्वाचे निर्णय येत्या बैठकीत घेतले जाणार आहेत. मुंबई महापौराच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून 27 तारखेला ती पार पडणार आहे.
पुण्यातल्या अनेक प्रायोगिक नाट्यसंस्थांनी आपल्या नाट्यगृहांची भाडी कमी केली आहेत. सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे सभागृह आदींनी तर भाडं नाकारून केवळ प्रकाश, ध्वनि यंत्रणेचं भाडं देऊन नाटक करा असं आवाहन केलं आहे. दुसरीकडे ठाण्यातल्या नाट्यगृहांनीही आपली भाडी कमी केली आहेत. अशात मुंबईत काय निर्णय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर म्हणाले, 'नाटक करताना नाट्यगृहांची भाडी हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आता नव्याने नाटकांना सुरूवात होत असल्याने प्रेक्षकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे आत्ताच सांगता येणार आहे.
नाटक ही जिवंत कला असल्यामुळे एक प्रयोग करायचा असला तरी खर्च तेवढाच येत असतो. एरवी प्रेक्षकांची हमी असते. आता प्रेक्षकांची हमी देता येत नाही त्यात प्रेक्षागृहात निम्म्या प्रेक्षकसंख्येने नाटक करायचं आहे. अशात खर्चात कपात झाली तर नाटक करणं सोपं होईल. काही खर्च कमी झाले शिवाय, त्यात सरकारने काही मदत केली तर प्रेक्षकांच्या तिकिटातही काही सवलत देता येते का याचा विचार होऊ शकतो. याबद्दलच आता येत्या 27 तारखेला एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय घेतले जातील.'
'बॉब बच्चन'चा लूक आला समोर, सुजॉय घोषच्या नव्या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरूवात
नाट्यव्यवसायाचा पुनश्च हरिओम पाहता व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाच्या जागतिक रंगधर्मी नाट्यनिर्माता संघाने काही नव्या गोष्टी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार त्या संघाशी संबंधित कलाकारांनी आपली मानधनं 50 टक्क्यांनी कमी केली आहेत. नाट्यपरिषदेशी संलग्न असणारा निर्माता संघही काही योजना करण्याच्या विचारात आहे. आता ते निर्णय काय असतील याबाबत मात्र 27 तारखेनंतरच कळू शकणार आहे.
नाट्यव्यवसायाला आता शुभारंभाचे वेध लागले असून त्याची सुरूवात पुण्यातून होते आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबरला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहं आणि बालगंधर्व इथे प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा सही रे सहीचे प्रयोगही होणार आहेत.