मुंबई : अनलॉकिंग झाल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी चित्रिकरणांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे सगळे कलाकार आता बिझी झाले आहेत. एरवी लॉकडाऊन काळात घराघरांत बसलेला कालाकार आता काम सुरू झाल्यावर चित्रिकरणासाठी बाहेर पडला. साहजिकच कामामुळे तो सोशल मीडियावर कमी दिसू लागला आहे. अनेक लोकांनी आता माध्यमांवर असणंच नाकारलं आहे. आता बऱ्याच महिन्यांनी सुरू असलेल्या कामावर लक्ष देऊन ते आपलं काम कसं चोख होईल हे पाहतायत. अनेक कलाकार चित्रिकरणाला बाहेर पडले याला अभिषेक बच्चनही अपवाद नाही. पण आत्ता त्याच्या नावाची चर्चा वेगळ्या कारणाने होते आहे.


एका दिवसापूर्वीच अभिषेक बच्चनने चित्रिकरणात भाग घेतला. सध्या प्रख्यात बंगाली दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या बॉब बिस्वास या सिनेमात अभिषेक बच्चन मुख्य भूमिका साकारतो आहे. या सिनेमातला अभिषेकचा लूक आता समोर आला आहे. या नव्या लूकमध्ये अभिषेक बच्चनचं पूर्ण ट्रान्स्फॉर्मेशन झाल्याचं दिसतं. या सिनेमाचं चित्रिकरण कोलकाता इथे सुरू झालं आहे. अभिषेक बच्चनसोबत या सिनेमात चित्रांगदा सिंगही झळकणार आहे. या दोघांचेही या सिनेमातले लूक्स समोर आले आहेत. अभिषेक बच्चन तर ओळखता येण्यापलीकडे आहे. यात अभिषेकने प्लेन ग्रे पॅंट परीधान केली आहे. तर निळ्या चौकड्यांचा शर्ट घातला आहे. शिवाय चष्माही आहे. लांबून बघता अभिषेकच्या चेहऱ्यावर उत्तम रंगभूषा केल्याचंही दिसतंय. तर त्याची हेअर स्टाईलही वेगळी आहे.



बॉब बिस्वास हा चित्रपट सुजॉय घोष या दिग्दर्शकाचा असून त्याने यापूर्वी कहानीसारखा चित्रपट दिला आहे. तर बॉब बिस्वास हा चित्रपट कहानी या चित्रपटाच्या पुढे जाणारी गुंतवून ठेवणारी गोष्ट असणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण खरंतर एप्रिल महिन्यात होणार होतं. पण लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं चित्रिकरण पुढे ढकलण्यात आलं. आता जवळपास आठ महिन्यांच्या गॅपनंतर हे चित्रिकरण पुन्हा सुरू झालं आहे.