मुंबई : हिंदी कलाविश्वात बहुमूल्य योगदान देणाऱ्या काही कलाकारांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचं नावही येतं. बिग बी, महानायक अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कित्येक दशकांपासून रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्याचा रुपेरी पडद्यावरील वावर म्हणजे एक वेगळाच अनुभव.
अशा या अभिनेत्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. यामध्ये बिग बींना एका पुरस्कारानं गौरवल्यानंतरचे क्षण पाहायला मिळत आहेत. हिंदी कलाविश्वातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ज्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.
Amitabh Bachchan | कधीही न झोपणारी मुंबई आज निपचित पडलीय...बीग बींनी व्यक्त केल्या आपल्या भावना
बिग बींना जेव्हा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तेव्हा त्यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. पुरस्कार घेऊन बिग बी जसे त्यांच्या जागी बसण्यासाठी आले, त्यावेळी त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी बिग बींना फार सुरेखपणे या क्षणाच्या शुभेच्छा दिल्या. आईवडिलांमधील प्रेम पाहून अभिषेक बच्चननं अतिशय खोडकरपणे यावर प्रतिक्रियाही दिली.
आतापर्यंत बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी अनेकदा चित्रपटाच्या निमित्तानं स्क्रीन शेअर केली आहे. पण, त्यांची ही ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच सध्या अधिक चर्चेत आली आहे.