KK Love Story : प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे काल (31 मे)  निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. Voice of Love अशी त्यांची ओळख होती.  पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा आणि दोन मुलं असं केके यांचे कुटुंब आहे.  त्यांच्या लव्ह लाइफबाबत अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात त्यांच्या लव्हस्टोरीबाबत... 


केके आणि ज्योती यांची लव्ह स्टोरी


केके यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं होतं. केके हे बालपणी ज्योती यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना ज्योती यांच्यासोबत लग्न करायचं होतं पण त्यावेळी केके हे बेरोजगार होते. ज्योती यांच्या पालकांनी केके यांना त्यावेळी सांगितले होते की, ज्योतीसोबत जर त्यांना लग्न करायचं असेल तर त्यांना नोकरी करावी लागेल. त्यामुळे ज्योती यांच्यासोबत लग्न करण्यासाठी केके यांनी सेल्समनची नोकरी करण्यास सुरूवात केली. ही नोकरी केके यांनी तीन महिने केली. 1991 मध्ये केके आणि ज्योती यांचा विवाहसोहळा पार पडाला. त्याच वर्षी केके यांचा पल हा पहिला अल्बम रिलीज झाला. 


केके यांनी 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील सलमान खानवर चित्रित करण्यात आलेल्या 'तडप तडप के इस दिल से आह निकलती राही' या गाण्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री  केली. त्याचवेळी, 2004 मध्ये 'तू आशिकी है...' या गाण्यासाठी केके यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ओम शांती ओम, जन्नतसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी हिट गाणी गायली.


प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. केके यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


इतर संबंधित बातम्या