Krishnakumar Kunnath Died : प्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. के.के. यांच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांच्या विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून ते आमच्या कायम स्मरणात राहतील, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह भारताचा माजी क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवाग याने केके यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्दांजली वाहिती आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमान मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.