कलाकार : स्पर्श श्रीवास्तव, अंशुमन पुष्कर, अक्षा पर्दसानी, अमित सियाल, मोनिका पंवार, पूजा झा आणि अन्य
दिग्दर्शक: सौमेंद्र पाधी
रेटिंग: 2.5
नमस्कार सर, मैं एसडीआई बँक से स्वाती बात कर रही हूं. सर हमारे बैंक के सालाना लकी ड्रॉ में आपका अकाउंट नंबर पहले नंबर पर निकला है. अशी खोटी माहिती देणारा एक फोन येतो. बक्षीसाचं, गिफ्टचं, पैशांचं अमिश दाखवलं जातं. लोकांकडून त्यांच्या डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती घेतली जाते आणि....अकाऊंट साफ. सध्याच्या डिजिटल युगात जगासमोरची एक मोठी समस्या म्हणजे फिशिंग. फिशिंग या विषयाला केंद्रस्थानी ठेवून 'जामता'राची गोष्ट रचली आहे.
जामतारा हा झारखंड राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा गेल्या काही वर्षांपासून फिशिंगचं हब म्हणून ओळखला जातोय. 'जामतारा : सबका नंबर आएगा' या वेबसिरीजची गोष्ट याच जामतारामध्ये घडते.
फिशिंग म्हणजे काय?
लोकांचे फोन नंबर मिळवून त्यांना फोन केले जातात. फोन करुन धोक्याने समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यासंदर्भात तसेच त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती मिळवली जाते. त्या माहितीच्या आधारे समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. यालाच फिशिंग म्हणतात. फिशिंग हेच जामतारा जिल्ह्यातील कित्येक तरुणांच्या कमाईचे साधन होतं. 2014 ते 2018 या काळात जामतारामध्ये फिशिंगच्या आणि त्यासंबधित गुन्ह्यांच्या ज्या घटना घडल्या. या सत्य घटनांवर आधारीत 'जामतारा : सबका नंबर आएगा' ही वेबसिरिज बनवण्यात आली आहे. 10 एपिसोड असलेली ही वेबसिरीज नेटफ्लिक्सने प्रेक्षकांसमोर आणली आहे.
कथा काय?
सनी (स्पर्श श्रीवास्तव) आणि रॉकी (आंशुमन पुष्कर) हे दोन भाऊ (मामे भाऊ-आते भाऊ) या गोष्टीत मध्यवर्ती भूमिकेत आहे. हे दोघे जामतारामध्ये सुरु असलेल्या फिशिंगमधील दोन मोठे चेहरे आहेत. मोठा पुढारी होणे हे रॉकीचे स्वप्न आहे, तर सनीला फिशिंगच्या माध्यमातून जामतारामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचे आहे. हे दोघे आणि त्यांची टीम देशभरातील लोकांना फोन करुन त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांचे पैसे लंपास करत असतात. 17 वर्षांचा सनी त्याच्याच कोचिंग इन्स्टिट्यूटमधील इंग्रजी विषयाची शिक्षिका असलेल्या गुडिया सिंह (मोनिका पंवार) हिच्याशी लग्न करतो. इन्स्टिट्यूटमधल्या विद्यार्थ्यांना आणि गुडियाला पैशांचं अमिष दाखवून सनी कॉल सेंटर उभारतो आणि फिशिंगच्या धंद्याला मोठं स्वरुप मिळवून देतो. हे जोडपं दिवसाला लाखो रुपये कमवू लागतं. गुडियादेखील खूप महत्त्वकांक्षी आहे. तिला खूप पैसे कमवून कॅनडाला जायचं आहे. लग्नानंतर ती सनीवरदेखील वर्चस्व गाजवू लागते.
मोठी स्वप्न पाहणारे हो दोन तरुण आणि गुडिया जामताराचा आमदार ब्रजेश भान (अमित सियाल) याच्या नजरेत येतात. रॉकीला पुढारी व्हायचं असल्याने रॉकी ब्रजेशच्या आश्रयाला जातो. सनीला स्वतःवर खूप विश्वास असतो. तो ब्रजेशला भीक घालत नाही. त्यामुळे सनी आणि रॉकीमध्ये शत्रूत्व येऊ लागतं. रॉकी आणि इतर मुलं ब्रजेशच्या आश्रयाला जातात. या मुलांनी कमवलेल्या पैशांमधील अर्धा हिस्सा ब्रजेश घेतो. पंरतु सगळे मिळून जितके पैसे कमवतात त्या सर्वांपेक्षा एकटा सनी जास्त पैसे कमवत असतो. त्यामुळे ब्रजेश सनीला मोठ्या गुन्ह्यात अडकवू पाहात असतो.
ज्याप्रमाणे सनी, रॉकी, गुडिया आणि फिशिंग करणारी मुलं ब्रजेशच्या नजरेत येतात, तशीच ती पोलिसांच्याही नजरेत आलेली असतात. परंतु स्थानिक पोलीस या मुलांना पाठिशी घालत असतात. परंतु नव्यानेच जामतारामध्ये रुजू झालेल्या पोलीस अधिकारी डॉली साहू (अक्षा पर्दसानी) हीदेखील या मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करु लागते.
ब्रजेश सनीला फसवण्यात यशस्वी होतो का? सनी जामतारामधला सर्वात श्रीमंत व्यक्ती होतो का? रॉकी मोठा पुढारी होतो का? गुडिया कॅनडाला जाते का? ब्रजेश या तीन मुलांचा वापर करण्यात यशस्वी होतो का? तसेच पोलीस या मोठ्या टोळीपर्यंत पोहोचतात का? एसपी डॉली साहू या टोलीचा पर्दाफाश करण्या यशस्वी होते का? हे जाणून घेण्यासाठी आपण वेबसिरीज पाहायला हवी.
का पाहावी?
सिरीजमध्ये सर्व नवे चेहरे आहेत. परंतु सर्वांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. झारखंडमधले अशिक्षित तरुण, जामतारामधले फिशिंग करणारे तरुण त्यांनी अगदी उत्तमपणे उभे केले आहेत. त्यातही प्रामुख्याने सनीचा (स्पर्श श्रीवास्तव ) अभिनय लाजवाब झाला आहे. गुडियानेदेखील (मोनिका पंवार)उत्तम काम केलं आहे. डॉली साहूच्या भूमिकेत अक्षा पर्दसानीनेदेखील चांगला अभिनय केला आहे. त्यासोबत रॉकी (आंशूमन पुष्कर) आणि इतर कलाकारांनी अक्षरशः जामतारा समोर उभं केलं आहे. या नव्या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय पाहाण्यासाठी ही वेबसिरीज पाहायला हवी.
का पाहू नये?
वरील सर्व मुद्दे वाचल्यानंतर असं वाटेल की ही वेबसिरीज मस्ट वॉच आहे. परंतु वेबसिरीजमध्ये काही कमतरता आहेत.
जामताराचे प्रमोशन अशा प्रकार केलं जात आहे की, ही वेबसिरीज फिशिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफश करेल. त्याची गोष्ट सांगेल, परंतु लेखक आणि दिग्दर्शक फिशिंग करणाऱ्या रॅकेटची किंवा जामतारामधल्या फिशिंग हबची गोष्ट सांगताना अनेक ठिकाणी गोंधळले आहेत. दिग्दर्शक अनेक ठिकाणी भरकटला आहे. दिग्दर्शकाने फिशिंगचा विषय फार गांभीर्याने हाताळलेला नाही.
फिशिंग संबंधित आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसिरीजद्वारे आपल्याला मिळतील, या अपेक्षेने अनेकजणांनी ही सिरीज पाहिली किंवा पाहतील. परंतु त्यांचा भ्रमनिरास होणार आहे. फिशिंगचा व्यवसाय कुठून आणि कसा सुरु झाला? जामतारा जिल्हा फिशिंग हब किंवा या कुकर्माची राजधानी कसा झाला? लोकांना मुर्ख बनवल्यानंतर काय केलं जातं? पैसे कसे चोरतात? जामतारामधली अशिक्षित किंवा अवघं लिहिता वाचता येईल इतकं शिक्षण असलेली मुलं फिशिंगसारखा व्यवसाय कशी शिकली? यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला वेबसिरीजमधून मिळत नाहीत.
पाचव्या एपिसोडनंतर सिरीज क्राईम थ्रिलर चित्रपटाप्रमाणे वळण घेते. दिग्दर्शक सोमेंद्र पाधी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पंरतु तो प्रेक्षकांना रुचत नाही. कारण सिरीजला थ्रिलर बनवण्यासाठी नवी कन्सेप्ट दिग्दर्शकाने मांडलेली नाही. सिरीजमध्ये ट्विस्ट आणि सस्पेन्स नसल्यामुळे सिरीज रटाळ वाटू शकते.
जामतारा ही सिरीज मिर्झापूर, गँग्स ऑफ वासेपूर, गंगाजल, आर्टिकल 15 या चित्रपट आणि वेबसिरीजचा कोलाज आहे. असं म्हणता येईल. परंतु हा कोलाज आकर्षक फुलांचा बुके होण्याऐवजी शिळ्या खिचडीप्रमाणे झाला आहे.
जामताराचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षकांचं समाधान होत नाही. चार तासांपेक्षा अधिक वेळ प्रेक्षक ही सिरीज पाहतील परंतु शेवटी त्यांना एक चांगलं आऊटपूट मिळत नाही. चांगला शेवट पाहायला मिळत नाही.
नेटफ्लिक्सचं सातत्यपूर्ण अपयश
ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात आल्यापासून नेटफ्लिक्स इंडियाने सातत्याने प्रेक्षकांना चांगला कॉन्टेन्ट देऊन लोकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु गेल्या काही महिन्यात नेटफ्लिक्स इंडिया सातत्याने अपयशी ठरत आहे. गेल्या काही महिन्यात नेटफ्लिक्स इंडियाने भारतात 'बार्ड ऑफ ब्लड', 'ड्राइव्ह (चित्रपट)', 'हाउस अरेस्ट', 'घोस्ट स्टोरीज' या सिरीज प्रदर्शित केल्या. या सिरिज अपयशी ठरल्याआहेत. त्याचप्रमाणे 'जामतारा'देखील अपयशीच सिरीज म्हणावी लागेल.
ट्रेलर 1
ट्रेलर 2