मुंबई : गेल्या काही काळात अनेक मोठ्या आणि प्रतिभावान लोकांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरुन गेलं आहे. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. साऊथमधील आयकॉनिक अभिनेत्री व्ही जे चित्रानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ती 28 वर्षांची होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीचं तिचं चेन्नईतील एक प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवि यांच्याशी साखरपुडा झाला होता. अभिनेत्री चित्राच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिस याबाबत तपास करत आहेत.
विजय टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या पेंडियन स्टोअर्स या प्रसिद्ध मालिकेतील भूमिकेमुळं चित्रा चांगलीचं प्रसिद्धीला आली होती. या मालिकेत तिनं मुल्लाईची भूमिका निभावली आहे. ती नैराश्यात होती अशी माहिती आहे. यातूनच तिनं चेन्नईच्या नासरपेट येथील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार ईवीपी फिल्म सिटीमधील शूटिंगनंतर चित्रा रात्री 2.30 वाजता हॉटेलमध्ये परतली होती. ती हॉटेलमध्ये हेमंतसोबत राहात होती. हेमंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, हॉटेलवर आल्यानंतर चित्रानं सांगितलं की ती अंघोळीसाठी जात आहे. मात्र ती बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. दरवाजा वाजवल्यानंतरही काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर हेमंतनं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता चित्राचं शव लटकलेल्या अवस्थेत आढळलं.
बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या आत्महत्यांनी खळबळ उडाली आहे. आपल्या क्षेत्रातील अपयशासह तणाव आणि इतर काही कारणांमुळे आत्महत्या होत असल्याचं समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येने भारताला धक्का बसला होता. त्यानंतरही बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील काही लोकांच्या आत्महत्यांनी खळबळ उडाली होती.