Vitthala Tuch : पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचे माहेरघर आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे आषाढी एकादशी दिवशी विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटली की, प्रथम डोळ्यासमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. विठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधत 'विठ्ठला तूच' या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या चित्रपटातील पहिले वहिले विठूरायाची वाहवा करणारे 'विठ्ठला तूच तूच तू' हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला आले आहे.
'वाय.जे. प्रॉडक्शन' निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' या चित्रपटातील हे गाणे असून, आषाढी एकादशीचे निमित्त साधून हे गाणे विठुरायाच्या भक्तांसाठी समोर आले आहे.
पाहा गाणे :
वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकदशीचे मोठे महत्त्व आहे. तर, विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेल्या भक्ताला विठ्ठलाच्या तालावर नाचवण्यास 'विठ्ठला तूच तूच तू' हे भक्तिमय गीत नक्कीच प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवेल यांत शंकाच नाही. 'विठ्ठला तूच तूच तू' या गाण्याला संगीत संगीतकार हर्षित अभिराज यांनी दिले असून, या गाण्याच्या गायनाची धुराही हर्षितने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर, या गाण्याच्या कोरियोग्राफीची जबाबदारी योगेश जम्मा यांनी सांभाळली आहे. तर या गाण्यात नवोदित अभिनेता योगेश जम्मा, अभिनेत्री उषा बिबे, सुशील पवार, हर्षित अभिराज झळकले आहेत. 'विठ्ठला तूच' चित्रपटाची कथा ही रोमँटिक आहे, तर चित्रपटातील गाण्यात विठूरायाला एका विठ्ठलभक्ताने घातलेली आर्त साद पाहणे रंजक ठरणार आहे.
प्रत्येकाला आपण विठुरायाला कधी भेटतो याची आतुरता लागलेली असते. मात्र काही कारणास्तव या वारी पर्यंत कित्येकदा आपल्याला जाता येत नाही त्यामुळे यंदाच्या आढाषी एकादशी निमित्त विठुरायाचे हे 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'विठ्ठला तूच तूच तू' हे गाणे या सुंदर क्षणाची उणीव भरून काढेल यांत शंकाच नाही.
हेही वाचा :