Visakha Subedar Son Returned From Kuwait: अमेरिका (US), इस्राएल (Israel Iran War) आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आखाती देशांमधील विमानवाहतूकही विस्कळीत झाली आहे. अशातच शेकडो मराठी नागरिक आजही आखाती देशांमधील विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबीय आजही काळजीत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Marathi Actress Visakha Subedar) यांनी एक व्हिडीओ शेअर करुन आपलाही मुलगा कुवेतमध्ये अडकल्याची माहिती दिली होती. तसेच, आपल्या मुलाला सुखरुप परत आणावं यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडं घातलं होतं. विशाखा सुभेदार यांनी रडत रडतच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः विशाखा सुभेदारांना फोन करुन मुलाला सुखरुप परत आणू असं आश्वासन दिलेलं. अशातच आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईला परत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर अभिनेत्रीचा मुलगा सुखरुप भारतात परतला आहे. 

Continues below advertisement

विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमार्गे लंडनला निघाला होता. कुवेत इथे त्याचा ट्रान्झिट स्टॉप होता. याच दरम्यान इराणनं कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केल्यानं कुवेतचं हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणंही रद्द केलेली. त्यामुळे अभिनय आणि त्याच्यासह अन्य काही मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडलेले. पुढे लंडनला जाणं किंवा मायदेशी परतणं यापैकी कुणालाच शक्य नव्हतं. त्यामुळे सारेच युद्धजन्य परिस्थितीच्या तणावानं भयभीत झालेले. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्यानं जीवाचा प्रश्न निर्माण झालेला. 

रडत-रडतच विशाखा सुभेदारांनी केलेलं मुलाला परत आणण्याचं आवाहन 

या संदर्भात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मदतीचं आवाहन करत एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केलेला. सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदतीची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेत सूत्रं हलवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री कार्यालयानं वेगानं पावलं उचलत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेश मंत्रालयाच्या सातत्यानं संपर्कात होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करण्यास सांगितलेलं. अशातच सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि विशाखा सुभेदारांचा मुलगा आणि त्याच्यासह कुवेतमध्ये अडकलेले इतरही मराठी नागरिक सुखरुप मुंबईत दाखल झाले. 

Continues below advertisement

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत कसा परतला? 

कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार आणि अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) इथून भारतात परत आणण्याचं नियोजन झालं. मात्र अभिनय सुभेदार यांच्यासह अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गती मिळाली आणि अभिनय यांच्यासह अन्य 30 महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे 700 किलोमीटर अंतराचा दहा तास प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले.

यानंतर रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइटद्वारे त्यांच्या परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे रियाधहून 9 मार्च रोजी भारतीय वेळेप्रमाणे रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या दिशेनं येणारं विमान हवेत झेपावलं. त्यानंतर 10 मार्चच्या मध्यरात्री 3 वाजता मुंबईत दाखल झालं. या विमानातून अभिनय सुभेदारसह महाराष्ट्रातील सुमारे 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परत दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेत येथील भारतीय दूतावासानं आवश्यक सहकार्य केलं.