You Must Die : कोरोनानंतर नाट्यसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे (Vijay Kenkre) लवकरच 'यू मस्ट डाय' (You Must Die) हे रहस्यमय नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


गेल्या काही दिवसांत नाट्यक्षेत्रातील मात्तबर जाणकारांसोबत युवा लेखक आणि दिग्दर्शकांची फळी काही नवं करू पाहते आहे. यात लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर हे नाव आघाडीवर आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या साथीने 'अ परफेक्ट मर्डर'च्या खेळात प्रेक्षकांना गुंतविल्यानंतर आता पुन्हा ही जोडी 'यू मस्ट डाय' हे नवीन रहस्यमय, थरार नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 






'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग


'यू मस्ट डाय' या नाटकाचं लेखन नीरज शिरवईकरने केलं आहे. तर दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरेंनी सांभाळली आहे. अशोक पत्कींनी या नाटकाचं संगीत केलं आहे. तर येत्या 12 नोव्हेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. शर्वरी लोहकरे, सौरभ गोखले, संदेश जाधव, नेहा कुलकर्णी, अजिंक्य भोसले, हर्षल म्हामुणकर, प्रमोद कदम, विनिता दाते, धनेश पोतदार ही कलाकार मंडळी या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. 


'यू मस्ट डाय'चं कथानक काय?


जिथे पारदर्शकता असते तिथेच काही गुपीतंही दडलेली असतात. अशाच एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणाऱ्या व्यक्तीचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ 'यू मस्ट डाय’ या नाटकात पहायला मिळणार आहे. रहस्याची उकल होते न होते, असं वाटत असतानाच दुसरं रहस्य पुढं येऊन उभं ठाकतं. एक वेगळा खेळ इथे रंगतो. यामागे नक्की काय वास्तव आहे? याची खिळवून ठेवणारी मनोरंजक कथा या नाटकात पहायला मिळणार आहे.


आपण जे पाहतोय त्यामागील खरं कारण काय आहे हे उलगडू न देणं हे खूप मोठं आव्हान सस्पेन्स थ्रिलर प्रकारा मध्ये असतं. थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून गूढतेचा अनुभव देणारं 'यू  मस्ट डाय' हे नाटक प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल यात शंका नाही.


संबंधित बातम्या


Marathi Rangbhumi Din 2022 : 'एका लग्नाची पुढची गोष्ट' ते 'चारचौघी'; मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी