K. Viswanath Passes Away: तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ (K. Viswanath) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. हैदराबाद (Hyderabad) येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Falke Award) सन्मानित करण्यात आले होते.
विश्वननाथ यांनी तेलगु चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांनी काम केले आहे. ईश्वर, संजोग, सूर सरगम, कामचोर, जाग उठा इंसान, संगीत या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. विश्वनाथ यांच्या सहा दशकाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 10 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1992 साली विश्वनाथ यांना चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
चित्रपटसृष्टीत 'तपस्वी' या नावाने ओळख
19 फेब्रुवारी 1930 साली आंध्र प्रदेशच्या गुंटुरमध्ये जन्म झाला होता. के. विश्वनाथ यांनी चित्रपट जगामध्ये तपस्वी या नावाने ओळखले जात असे. आंध्र विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. विश्वनाथ यांनी साऊंड आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विश्वनाथ यांनी 55 चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर 43 चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले आहे. 1965 साली आत्मा गोवरवम या चित्रपटासाठी त्यांना नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कलाकारांकडून विश्वनाथ यांना श्रद्धांजली
विश्वनाथ यांच्या निधनाची बातमी समोर येताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल कपूर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "के. विश्वनाथजी मला तुम्ही अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. ईश्वर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सेटवर तुमच्यासोबत मला मंदिरात असल्यासारखे वाटत होते." तर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे
कमल विश्वनाथ यांचे गुरू
चित्रपटसृष्टीचे ऑल राऊंडर अभिनेते आणि दिग्दर्शक कमल हसन (kamal haasan) के. विश्वनाथ यांना आपले गुरू मानत होते. दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात हैदराबाद येथे के. विश्वनाथ यांना भेटण्यासाठी गेले होते.