Vasantrao Deshpande Birth Anniversary : ‘माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे, असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे! (Vasantrao Deshpande) संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाची आज जयंती. वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे 1920 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे झाला होता. त्यांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांच्या आई देखील भक्तीसंगीत गायच्या. त्यांच्याकडून हे बाळकडू वसंतराव यांना मिळालं होतं.


वयाच्या आठव्या वर्षी वसंतराव देशपांडे यांच्या प्रतिभेची दखल प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी घेतली. त्यांची कौशल्ये पाहून भालजींनी त्यांना कालिया मर्दन (1935) या हिंदी चित्रपटात भगवान कृष्णाच्या भूमिकेसाठी निवडलं.


अनेक गुरूंचा सहवास..


वसंतराव देशपांडे यांना अनेक गुरूंकडून संगीत ज्ञान लाभलं. नागपुरात त्यांनी शंकरराव सप्रे यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर, त्यांना भेंडी बाजार घराण्याचे अमान अली खान आणि अंजनीबाई मालपेकर, किराणा घराण्याचे सुरेश बाबू माने, पटियाला घराण्याचे असद अली खान आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्णबुवा वाजे यांच्याकडून गाण्याचे धडे मिळाले.


नाटकांमधील भूमिका अजरामर..


वसंतराव देशपांडे यांनी गाण्याच्या कोणत्याही एका विशिष्ट शाळेत प्रशिक्षण घेण्यास नकार दिला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी नेहमीच नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. ते दादरा, ठुमरी आणि गझल या हिंदुस्थानी शास्त्रीय शैलींमध्येही पारंगत होते. लाहोरमध्ये शिकत असताना त्यांनी या प्रकारांत प्रभुत्व मिळवले होते. मराठी नाट्यसंगीत हे आणखी एक क्षेत्र होते, ज्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले. ‘मेघ मल्हार’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘विज म्हणाली धरतीला’, ‘तुकाराम’, ‘हे बांध रेशमाचे’, आणि ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकांत त्यांनी काम केले होते.


वसंतरावांनी 80हून अधिक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन देखील केले. ‘अष्टविनायक’, ‘दूध भात’, ‘कालिया मर्दन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात ‘खान आफताब हुसेन खाँ’साहेबांची आव्हानात्मक भूमिका साकारून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.


राहुल देशपांडेनी दिला आठवणींना उजाळा


त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांचे नातू, शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांनीच वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. आज या खास दिवशी राहुल देशपांडे यांनी देखील आजोबंसोबतचा फोटो शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.



हेही वाचा :


Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!


Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!