Dharmendra Health Update: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर काल (1 मे) रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी परतल्यानंतर त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ‘मी धडा शिकलो..’, असं म्हणतं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
याआधी धर्मेंद्र यांना आणखी काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची बातमी आली होती. मात्र, नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता तब्येत कशी आहे आणि त्यांना रुग्णालयात का दाखल करावे लागले होते, याची माहिती त्यांनी या व्हिडीओमधून दिली आहे.
व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण...
या व्हिडीओच्या माध्यमातून धर्मेंद्र म्हणाले की, ‘मित्रांनो, काहीही अति करण्याच्या भानगडीत पडू नका. मी केले आणि आता त्याचे परिणामही सहन केले.’ धर्मेंद्र पुढे सांगतात की, ‘पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. ते दोन-चार दिवस कठीण होते. पण, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे. आता काळजी करू नका. मी स्वतःची खूप काळजी घेणार आहे.’
लवकरच झळकणार चित्रपटात
या वयातही अभिनेते धर्मेंद्र स्वत:ला फिट ठेवतात. ते अनेकदा त्यांच्या फार्महाऊसवर पोहताना आणि व्यायाम करताना दिसतात. वयाच्या 86व्या वर्षीही ते चित्रपट विश्वात सक्रिय आहेत. लवकरच ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहे.
हेही वाचा :
Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल