Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. वर्षा उसगावकर यांनी अनेक चांगल्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडतात. वर्षा उसगांवकर यांचा गंमत जंमत हा पहिला चित्रपट आहे, त्या चित्रपटाने सिनेसृष्टीत  निखळ विनोदाचा एक नवा ट्रेंड आणला. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) यांच्यासोबत एक होता विदुषक या चित्रपटात केलेल्या कामाबद्दलच्या आठवणी यावेळी त्यांनी सांगितल्या आहे. 


वर्षा उसगांवकर यांनी  गंमत जंमत, अफलातून, साथी असे अनेक चित्रपटांमधून वर्षा उसगांवकर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच त्यांना छोट्या पड्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नुकतच त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. एक होता विदुषक या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना केलेला फोन आणि त्यानंतर त्यांनी त्या चित्रपटाची केलेली निवड यासंदर्भात भाष्य केलं आहे. 


'तेव्हा लक्ष्याने मला फोन केला'


लक्ष्याची त्यावेळी एक विनोदवीर म्हणून प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला वेगळं काहीतरी करायचं होतं. त्यावेळी जब्बार पटेल यांनी त्याला एक होता विदुषक हा चित्रपट ऑफर केला. पु.ल.देशपांडे यांनी त्या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. तेव्हा लक्ष्याने मला फोन केला आणि सांगितलं वर्षा तुला हा चित्रपट करायचा आहे. यामध्ये विदुषकाचा रोल मी करतोय आणि या चित्रपटात तू मला हवी आहेस. तिथे पैशांचा विचार करु नकोस. तुला कदाचित कमी पैसे मिळतील, पण माझ्यासाठी तू हा चित्रपट कर. त्यानंतर जब्बार पटेल यांनी मला ती कथा ऐकवली आणि मला ती आवडली, ही आठवण वर्षा उसगांवकर यांनी सांगितली. 


'लक्ष्याला ती खंत राहिली'


एक होता विदुषक या चित्रपटात लक्ष्याने उत्तम काम केलं होतं. खूप मेहनत घेतली होती. तो शूटींगच्या वेळी त्याचा सीन नसला तरीही प्रत्येक सीनला हजर असायचा. पण तो चित्रपट म्हणावा तितका चालला नाही. त्या चित्रपटामधलं लक्ष्याचं काम हे अॅवॉर्ड विनिंग होतं. पण त्यावर्षी त्याला पुरस्कार मिळाला नाही, लक्ष्याच्या मनातही ही खंत राहिली आहे, असंही वर्षा उसगांवकर यांनी यावेळी म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


Divya Agarwal Wedding : पाडगांवकरांची सून होणार अग्रवालांची लेक, 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर घरीच पार पडणार अभिनेत्री दिव्या अग्रवालचा लग्नसोहळा, कारण सांगत म्हणाली...