Urfi Javed controversy: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फीविरोधत तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं होतं...  चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेद हिला इशारा दिलाय, त्याशिवाय महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. पण नेमका हा वाद आहे काय? याची सुरुवात झाली कुठून? 


काय आहे नेमका वाद?


चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वादाला सुरुवात सोशल मीडियावरुन झाली. ट्वीटरवरुन सुरु झालेला वाद..आज टोकाला पोहोचलाय..जिथं चित्रा वाघ यांनी फक्त तक्रार केली होती. मुंबई पोलिसांना पत्र दिलं होतं. तिथं आज चित्रा वाघ यांनी थेट इशाराच दिलाय आणि त्यांच्या आक्रमकतेला उर्फी जावेदचं उत्तर कारणीभूत असावं. हॅप्पी न्यू ईयर..टू एव्हरी वन...चित्रा वाघ यांना सोडून.. असं ट्वीट उर्फी जावेद हिने नवीन वर्षाला केलं होतं. उर्फी जावेदने अवघ्या जगाला  नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मात्र शुभेच्छा नाही.. असा उल्लेख केला. आता त्याला कारण होतं चित्रा वाघ यांनी केलेली तक्रार..


चित्रा वाघ यांनी काय केलं होतं ट्वीट?


अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई..हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे काही कलम आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये. असं ट्वीट चित्रा वाघ यांनी 30 डिसेंबर रोजी केलं होतं.  चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हीडिओही पोस्ट केला..त्याला तातडीनं उर्फीनं ट्विटरवरच उत्तर दिलं..


उर्फीनं काय दिला रिप्लाय? 


बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणे सहज सोपे आहे. माझ्यावर लक्ष केंद्रीत करून जनतेची दिशाभूल करताय. ज्यांना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे? तुम्ही अशा महिलांची मदत का करत नाही. महिलाचे शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं अशा गोष्टींवर तुम्ही का काही करत नाही?




ट्वीटरवर सुरु असलेला वाद नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणखी वाढला. कारण, चित्रा वाघ यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकरांची भेट घेतली. आणि उर्फी जावेदवर कारवाई करवी अशी मागणी केली..त्यासाठी पत्रही दिलं..






मग काय..आधी सोशल मीडियात अनेकवेळा ट्रोल झालेली आणि अनेकांना आपल्या स्टाईलनं उत्तरं देणारी..उर्फी जावेद चिडली आणि तीनं सोशल मीडियात चित्रा वाघ यांचा हाच फोटो पोस्ट करत...गुड जॉब असं कॅप्शन दिलं. आणि दुसऱ्या एका पोस्टमध्ये  थेट आव्हान दिलं..







उर्फीचं चित्रा वाघांना उत्तर


आणखी एका नेत्यांनं केलेल्या पोलिस तक्रारीनं माझ्या नव्या वर्षाची सुरुवात झाली. माझ्याविरोधात तक्रार करणारे नेत्यांना थोडीही कायद्याची जाण नाहीय. आज घडीला असं कोणतंही कमल नाहीय जे मला तुरुंगात टाकेल. अश्लिलता आणि नग्नतेची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असते. जोपर्यंत मी संपूर्ण नग्नावस्थेत फिरणार नाही, तोपर्यंत ते मला तुरुंगात टाकू शकणार नाही.चित्रा वाघ यांच्यासाठी माझ्या डोक्यात काही चांगल्या संकल्पना आहेत.  त्यांनी माझ्यावर लक्ष देण्यापेक्षा मुंबई मुलींची तस्करी होते, डान्स बार, वेश्या व्यवसाय यावर लक्ष द्यायला हवं. 


उर्फीच्या बिभत्स शरीरप्रदर्शनाचं महिला आयोग समर्थन करतंय का? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत महिला आयोगाला विचारला. त्यानंतर चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादात महिला आयोग उतरलं.  कोणी काय कपडे  घालावेत हा  ज्याचा त्याचा अधिकार, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी उत्तर दिलं. 


महिला आयोग काय म्हणालं?


कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातून ही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेंव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं. 


उर्फी जावेद आहे तरी कोण... .


उर्फी जावेदचा जन्म यूपीतील लखनौमधला 15 ऑक्टोबर 1997 ला जन्मलेल्या उर्फीनं मीडियाचं शिक्षण घेतलं आहे. 2016 ला'बडे भैया की दुल्हनिया' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. 'मेरी दुर्गा' मालिकेमुळे उर्फीला वेगळी ओळख मिळाली. पण, बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये तिची ओळख बदलली. तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली. अतरंगी कपड्यामुळे सोशल मीडियात ट्रेण्ड होऊ लागली. त्याचमुळे स्टाइलिंग आयकॉन बनली आहे. तर पोलिसांसह नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही आली पण, तरीही तिने आपली स्टाईल सोडली नाही. उर्फीनं अनेकवेळा आपल्या अतरंगी कपड्यांवरुन भाष्य केलंय.तिनं निर्माता साजिद खान..लेखक चेतन भगत..यांच्या अनेक सेलिब्रिटींसोबत सोशल मीडियात पंगे घेतलेत. त्यामुळेही अनेकवेळा वादात अडकलीय..याच वादात आता भाजपच्या चित्रा वाघ यांचीही भर पडली आहे.