Ullu App House Arrest Controversy : उल्लू अॅपवरील कंटेटवर भाजपच्या विधानपरिषदेच्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप नोंदवला होता. राज्यातील दोन्ही महिला नेत्यांनी उल्लू या अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर महाराष्ट्र सायबरने या अॅपवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबर सेल प्रमुख यशस्वी यादव म्हणाले की, "आम्हाला "हाऊस अरेस्ट" सारख्या वादग्रस्त शोबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही उल्लू अॅपला हा शो तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हे केल्यानंतर डेटा मिळवण्यात आलाय. जर आम्हाला आणखी तक्रारी आल्या तर आम्ही त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करू."
रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या की, उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला,पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत,महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत.याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे.हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता,स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा,माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.
चित्रा वाघ म्हणाल्या, भिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!” एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री @AshwiniVaishnaw जी यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”