मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ यांच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तूफान या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तर हा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. तर, मृणाल ठाकूर, सुप्रिया पाठक शाह, हुसैन दलाल आणि परेश रावत यांसारखी तगडी स्टारकास्टही चित्रपटातून झळकणार आहे.
अज्जू भाई या एका व्यक्तीच्या जीवनप्रवासावर आणि तो 'तूफान' म्हणून ओळखला जाईपर्यंतच्या वाटचालीवर चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे, ज्याची एक लहानशी झलक टीझरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
जिथं जाऊ तिथं वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या, हाणामारी करणाऱ्या अज्जू भाईचा एक निर्णय़ त्याला बॉक्सिंगच्या वर्तुळात आणून सोडतो. त्याच्या प्रेयसीच्या रुपात दिसणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि प्रशिक्षकांच्या रुपात दिसणारे अभिनेते परेश रावल यांच्या भूमिका पाहता हा चित्रपट आतापासूनच प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर टाकताना दिसत आहे.
बॉम्बे बेगम'समोरच्या अडचणी वाढल्या सीरिज थांबवण्याची बालहक्क आयोगाची मागणी
चित्रपटात्या नावाप्रमाणंच भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी अभिनेता फरहान अख्तर यानं घेतलेली मेहनत त्यानं साकारेलल्या अज्जू भाई, 'तूफान' या भूमिकेची झलक पाहताना लगेचच कळून येते. त्यातच सहाय्यक भूमिकेत असणाऱ्या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिकेला दिलेली साथ ही घडी आणखी नीट बसवून जाते. या चित्रपटाच्या निमत्तानं फरहान आणि मृणाल यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
21 मे या दिवशी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमच्या माध्यमातून 240हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं 'भाग मिल्खा भाग' या गाजलेल्या चित्रपटानंतर फरहान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा हे तब्बल सात वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. त्यामुळं या चित्रपटाकडून प्रेक्षक आणि समीक्षकांनी बऱ्याच अपेक्षा ठेवल्या आहेत.