मुंबई : गेल्या महिला दिनाचं निमित्त साधून नेटफ्लिक्सवर आलेल्या बॉम्बे बेगम या वेबसीरीजसमोरच्या आडचणीत वाढ झाली आहे. या सीरीजमध्ये असभ्य कंटेंट दाखवल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या सीरीजच्या निर्मात्यांना नोटिस बजावली आहे. या नोटिसीचं 24 तासांत उत्तरही मागितलं आहे. त्याचं उचित उत्तर जर आलं नाही तर आपल्याला कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशाराही आयोगाने दिला आहे.
बॉम्बे बेगम ही अलंकृता श्रीवास्तव यांची सीरीज असून पाच महिलांची मुंबईत राहण्यासाठीची धडपड, त्यांचा संघर्ष यात मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. या सीरीजमध्ये पूजा भट्ट, आध्या आनंद, अमृता सुभाष आदींच्या भूमिका आहेत. एनसीपीसीआर अर्थात नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन फॉर चाईल्ड राइट्स यांनी या सीरीजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटवर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडीयावर काहींनी या सीरीजमध्ये चित्रित झालेल्या बाबी दाखवल्यानंतर कमिशनने हे पाऊल उचललं आहे. या सीरीजमध्ये अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थाचं सेवन करताना दाखवलं आहे. शिवाय, या मुलांसोबत दाखवल्या गेलेल्या गोष्टी अयोग्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या बद्दल याचिका दाखल झाल्यानंतर कमिशनने यात लक्ष घातलं आहे. नेटफ्लिक्स ला या कमिशनने 24 तासांची मुदत दिली आहे. या वेळेत नेटफ्लिक्सकडून योग्य उत्तर आलं नाही तर आपल्याला कायेदशीर कारवाई करावी लागेल असं यात नमूद करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्राने ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटवर नियमावली घालून दिली आहे. तर यापूर्वी तांडव या वेबसीरीजवरूनही बराच वादंग माजला होता. त्यावरून तांडवच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना माफी मागावी लागली आहे. ही गोष्ट ताजी असतानाच आता बॉम्बे बेगममध्ये दाखवल्या गेलेल्या चित्रिकरणावरून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. एसीपीसीआरने पाठवलेल्या नोटिशीनुसार, भारतात अल्पवयीन मुलांचं कोणंतही आक्षेपार्ह चित्रण अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. अशाने मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत असल्याचंही म्हटलं आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने पाठवलेल्या या नोटिशीवर अद्याप नेटफ्लिक्सकडून अधिकृत भाष्य झालेलं नाही. तर या वेबसीरीजच्या निर्मात्यांकडूनही अद्याप मौनच बाळगलं गेलं आहे. येत्या 24 तासांत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.