Sonali Phogat Passed Away: टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे आज (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या या निवडणुकीत पराभूत झाल्या. 2019च्या निवडणुकीत आदमपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई विरुद्ध सोनाली फोगाट असा सामना होता. यात कुलदीप बिश्नोई यांचा विजय झाला. यानंतर भाजपच्या हरियाणा युनिटने त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
शॉर्ट व्हिडीओ आणि राजकारणच नव्हे, तर सोनालीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगाटने निधनाच्या काही तासांपूर्वी म्हणजेच सोमवारी रात्री इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगाट यांनी बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 14व्या सीझनमध्ये भाग घेतला होता.
अँकरिंगपासून करिअरची सुरुवात
सोनाली फोगाट यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2006मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करण्यापासून केली होती. दोन वर्षांनंतर 2008मध्ये सोनाली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून सोनाली भाजपच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली फोगाट सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली होती. सोनाली फोगाट यांनी पंजाबी आणि हरियाणवी म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. 'अम्मा' या मालिकेत सोनाली यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
सोनाली आणि वाद!
सोनाली फोगाट या अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या होत्या. जून 2020 दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोनाली फोगाट एका अधिकाऱ्याला चप्पल मारताना दिसल्या होत्या. सोशल मीडियावरील या वादामुळे बराच गदारोळ झाला होता. यानंतर सोनाली फोगाट यांनी त्यांची बहीण आणि भावाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामुळे देखील त्या चर्चेत आल्या होत्या. यांनंतर त्या त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आल्या होत्या. ‘बिग बॉस 14’च्या घरात त्यांनी आपल्याला अली गोनी आवडतो, असे म्हटले होते. यावरून घरात बराच वाद झाला होता.
सोनाली फोगाट 2019 दरम्यानच्या त्यांच्या एका भाषणामुळे देखील वादात अडकल्या होत्या. हिसारमधील एका गावात रॅलीदरम्यान त्यांनी लोकांना 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यास सांगितले होते. जे लोक घोषणा देत नाहीत, ते नक्कीच पाकिस्तानचे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर सोनाली फोगाट यांना त्याच्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली होती.
हेही वाचा :