Little Things Season 4 Review : यूट्यूबपासून सुरुवात होऊन नेटफ्लिक्सवर पर्यंत 'लिटिल थिंग्स'च्या चौथ्या सीझनची घोडदौड झाली आहे. धुव्र वत्स (धुव्र सहगल) आणि काव्या कुलकर्णी (मिथिला पालकर) च्या बाबू-शोना वाल्या प्रेम प्रकरणाचा कधी हो तर कधी नाही म्हणता म्हणता 'हॅपी एंड' पर्यंतचा प्रवास झाला आहे. मेट्रो शहरात राहणाऱ्या, नव्या युगाच्या तरुणांना ही वेबसीरिज आकर्षित करते. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा त्या दोघांचा सहा वर्षांचा प्रवास आहे.
या वेब सीरिजची सुरुवात ध्रुव आणि काव्या एकमेकांना अनेक वर्षांनी बंगळूरला भेटतात अशी होते. अनेक वर्ष एकत्र न राहिल्यामुळे ते दोघे एकमेकांच्या किती जवळ येतात हे उलगडण्याचा प्रयत्न वेबसीरिजमधून करण्यात आला आहे. नात्यातील समजूतदारपणा, परिपक्वता आणि बारकाव्यांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न सीरीजमध्ये करण्यात आला आहे. जे खऱ्या आयुष्यातील नाते समृद्ध बनवायला देखील मदत करते.
ही वेब सीरिज चार सीझनची असली तरी मालिकांमध्ये दाखवण्यात येणारा नाटकीपणा यात दिसून येत नाही. धुव्र आणि मिथिलाचा अभिनय इतका सटल आहे. कथानकात एक दुसऱ्यांविषयीचा आपलेपणा, प्रेम , जिव्हाळा दाखवण्यात आला आहे.
'लिटल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन
आतापर्यंत 'लिटल थिंग्स'चे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. पण 'लिटिल थिंग्स'चा हा शेवटचा सीझन असणार आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.
या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
येत्या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. 'रश्मि रॉकेट' येत्या 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.