kasha astat hya bayka short film : तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकर छोट्या पडद्यावरील नावाजलेले कलाकार आहेत. नुकतेच तेजश्रीने अग्गबाई सासूबाई मालिकेत शुभ्रा नावाचे पात्र साकारले होते. तर अभिजीत 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत गुरुनाथ नावाचे पात्र साकारत होता. आता तेजश्री आणि अभिजीत नव्या कोऱ्या लघुपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


'कशा असतात या बायका' या शीर्षकाचा भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणारा लघुपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लघुपटाच्या माध्यमातून तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकरची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे सुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण करत आहे. 'कशा असतात या बायका' असे शीर्षक असलेला हा लघुपट घर, कुटुंब आणि करिअर सांभाळणाऱ्या सर्व महिलांना समर्पित आहे. हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. 


अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देणारा हा लघुपट असणार आहे. ही या लघुपटाची महत्तवाची बाब आहे. अप्रत्यक्षपणे हा लघुपट नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतो. जरी भाऊबीज या थीमवर हा लघुपट असला तरी कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट आहे. वैभव पंडित यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर मोनिका धारणकर यांनी या लघुपटाचे लेखन केले आहे. 


या लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कौशिक मराठे सांगतात,"आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणे बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे."


लघुपटात महत्तवाची भूमिका निभावणारी तेजश्री प्रधान म्हणते,"भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी... आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट!"