Balasahebancha Raj Drama : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'बाळासाहेबांचा राज' (Balasahebancha Raj) हे नाटक रंगभूमीवर येत आहे. हे नाटक मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. 


'या' दिवशी रंगणार शुभारंभांचा प्रयोग 


'बाळासाहेबांचा राज' (Balasahebancha Raj) या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारीला होणार आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात दुपारी 4.30 वाजता या नाटकाचा शुभारंभांचा प्रयोग पार पडणार आहे. 


'बाळासाहेबांचा राज' या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अनिकेत बंदरकर (Aniket Bandarkar) यांनी सांभाळली आहे. तर मनसे नेते अमेय खोपकर, बाळा नांदगावकर, राजू पाटील, अविनाश जाधव यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. आजवर राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर बेतलेले सिनेमे रुपेरी पड्यावर आले आहेत. पण बाळासाहेब आणि राज यांच्यामधलं भावनिक नातं उलगडण्याचा प्रयत्न आता 'बाळासाहेबांचा राज' या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर होत आहे. 






'बाळासाहेबांचा राज' नाटकात काय पाहायला मिळणार? 


'बाळासाहेबांचा राज' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक अनिकेत बंदरकर म्हणाले,"बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज ठाकरे आहेत, अशी जनमानसात भावना आहे. आता 'बाळासाहेबांचा राज' या नाटकात प्रेक्षकांना राज ठाकरेंवर बाळासाहेबांचे झालेले संस्कार, काका-पुतण्या म्हणून राज ठाकरे आणि बाळासाहेबांचं आपुलकीचं नातं, माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे कसे होते याचा एकंदरीत प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे". 


गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून 'बाळासाहेबांचा राज' या नाटकाची तालिम सुरू आहे. शुभारंभाच्या प्रयोगानंतर या नाटकाचे महराष्ट्रभर दौरे होणार आहेत. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचं नातं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नाटकात कलात्मक नैपथ्याचा वापर करण्यात आला आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेलं हे पहिलचं नाटक रंगभूमीवर आलं आहे. आता या नाटकात बाळासाहेबांची आणि राज ठाकरेंची भूमिका कोण साकारणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


 


Raj Thackeray : हेलिकॉप्टरने परळीत एन्ट्री, कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड, राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द